1.64 कोटीचा ड्रग्ज जप्त
पर्रा-बार्देश येथे कारवाई : एका नायजेरियन संशयिताला अटक
प्रतिनिधी/ पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) पर्रा येथे केलेल्या कारवाईत 1 कोटी 64 लाख 94 हजार किंमतीचा ड्रग्ज जप्त केला. या प्रकरणात एका नायजेरियन संशयिताला अटक केली, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली. जानेवारी 2025 ते आतापर्यंत गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी एकूण 57 कोटी ऊपये किंमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे तर 15 संशयितांना अटक केली आहे. राज्यातून ड्रग्जचा नायनाट करणे हेच सीआयडीचे उद्दीष्ट आहे, असेही राहुल गुप्ता म्हणाले.
काल शनिवारी पोलिस खात्याच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) बोलत होते. अटक केलेल्या संशयिताचे नाव नॅन्येलूगो अॅबासिली (वय 23, नायजेरियन) असे आहे. संशयित 28 एप्रिल रोजी विद्यार्थी व्हिसावर गोव्यात येऊन पर्रा येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. तेलंगणा अँटीनार्कोटिक ब्युरोकडून आलेल्या माहितीनुसार सीआयडी पोलिसांनी पर्रा येथे संशयित राहत असलेल्या खोलीवर शुक्रवार 9 रोजी रात्री छापा घातला आणि संशयिताला रंगेहाथ अटक केली.
संशयिताच्या ताब्यातून विविध प्रकारचे अमलीपदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ जप्त केले गेले आहेत. त्यात 60 ग्रॅम कोकेन, 99 ग्रॅम ब्रॉन हेरॉइन, 1.123 ग्रॅम एक्स्टेसी टॅब्लेट (एकूण 2,400 गोळ्या), 19 ग्रॅम क्रिस्टल एमडीएमए आणि भारतीय चलनातील रोख रक्कम 70,000 ऊपये एकूण 1 कोटी 64 लाख 94 हजार रुपये मुद्देमाल जप्त केला. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायदा 1985 कलम 21 (ब), 22 (क) अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.
निरीक्षक हिरू कवळेकर, महिला पोलिस उपनिरीक्षक प्रगती मळीक, साहाय्यक उपनिरीक्षक श्रीराम साळगावकर, कॉन्स्टेबल संदेश कांबळी, स्वप्नील सिमेपुऊषकर आणि कॉन्स्टेबल चालक पुंडलिक नावेलकर यांनी ही कारवाई केली आहे. सीआयडीचे निरीक्षक तुषार लोटलीकर आणि लक्ष्मी आमोणकर यांच्या एका आठवड्याच्या टेहळणीनंतर हे यश मिळाले आहे. सीआयडीचे उपअधीक्षक राजेश कुमार आणि अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) यांच्या देखरेखीखाली निरीक्षक हिरू कवळेकर पुढील तपास करीत आहेत.
गोवा पोलिसांनी 2025 सालात ड्रग्ज तस्करीविऊद्ध जोरदार मोहीम सुरू केली आहे. गोवा पोलिसांनी एकूण 68.36 कोटी ऊपयांचा ड्रग्ज जप्त केला असून 74 संशयितांना अटक केली आहे. त्यापैकी सीआयडी पोलिसांनी 57 कोटी ऊपये किंमतीचा ड्रग्ज जप्त केला असून 15 संशयितांना अटक केली आहे. त्यात भारतात कार्यरत असलेल्या दोन व आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.