पंजाबमध्ये 800 कोटीचे ड्रग्ज जप्त
पंजाबमध्ये या लोकसभा निवडणुकीच्या काळात आतापर्यंत 801 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ आणि मद्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सिबीन सी. यांनी दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या साधनांमध्ये रोख रकमेचाही समावेश आहे. 716.78 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, 26.89 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम, 26.75 कोटी रुपयांचे मद्य आणि 23.86 कोटी रुपयांचे मौल्यवान धातू हस्तगत करण्यात आले आहेत. या वस्तू मतदारांना आकर्षिक करण्यासाठी वाटल्या जाणार होत्या.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात 284 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर वस्तू आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. 2024 च्या निवडणुकीत आयोगाने आदर्श आचारसंहितेचे कठोरपणे पालन करण्याचा आदेश दिला होता. तसेच यंत्रणा अधिक बळकट केली होती. त्यामुळे केवळ पंजाबमध्येच नव्हे, तर देशभरात प्रचंड प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम, मद्य, अंमली पदार्थ, सोने इत्यादी मौल्यवान धातू अशा वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. पंजाबमध्ये आज शनिवारी लोकसभेच्या सर्व 13 जागांसाठी मतदान होत आहे.