गुजरातमध्ये 4 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त
कारखान्यावरील धाडीत 427 किलो कोकेन हस्तगत : तीन आरोपींना अटक
वृत्तसंस्था / गांधीनगर
गुजरात राज्याच्या अंकलेश्वर येथील एका कारखान्यातून 400 किलोहून अधिक अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अवसार एंटरप्रायझेस नावाच्या कारखान्यावर टाकलेल्या धाडीत 427 किलो कोकेन आणि 141 ग्रॅम मेथांफेटामाईन हस्तगत करण्यात आले. याशिवाय अन्य प्रकारचे अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
अंकलेश्वर येथील अवसार नामक कारखान्यात हे अमली पदार्थ दडवून ठेवण्यात आले होते. त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 4 हजार कोटी रुपये होते, अशी माहिती देण्यात आली. ही धाड सुरत पोलीस आणि गुजरातच्या अमली पदार्थ विरोधी दलाने संयुक्तरित्या आयोजित केली होती. या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश देण्यात आला असून पुढील तपास पोलिसांनी हाती घेतला आहे.
दुसरी मोठी धाड
गुजरातमध्येच काही दिवसांपूर्वी 3 हजार कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले होते. त्यानंतरची ही दुसरी मोठी धाड आहे. त्यापूर्वी दिल्लीत 5 हजार किलो अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 20 हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
भारत महत्त्वाचा ट्रांझिट पॉईंट
आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ व्यापारात भारताला एक मोठा ट्रांझिट पॉईंट बनविण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ टोळ्यांकडून केला जात आहे. भारतात कच्च्या स्वरुपातील अमली पदार्थांवर प्रक्रिया करुन अंतिम पदार्थ बनविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये अशा अनेक संशयित प्रक्रिया कारखान्यांवर धाडी घातल्या गेल्या आहेत.
गुप्तचरांची माहिती
गुप्तचर विभागाने या अमली पदार्थांच्या भारतातील आयातीविषयी माहिती दिली होती. या माहितीच्या आधारावर सोमवारी अवसार कारखान्यावर धाड घालण्यात आली. कारखान्याच्या गोदामात छोट्या पिशव्यांमध्ये अमली पदार्थ दडवून त्यांच्यावर गवत आणि कापडाच्या चिंध्या यांचे आवरण घातण्यात आले होते. पोलिसांनी कसून तपासणी केल्यानंतर हा साठा त्यांच्या हाती लागला. तो अफगाणिस्तानातून आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतात सध्या मध्यपूर्व आणि दक्षिण अमेरिकेतून अमली पदार्थांची बेकायदेशीर आयात केली जात आहे.
प्रक्रिया करण्यासाठी आयात
भारतात अमली पदार्थांवर प्रक्रिया करण्यासाठी ते आणले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कच्च्या स्वरुपातील अमली पदार्थांवर प्रक्रिया करुन त्यांच्यापासून महागडी ड्रग्ज बनविली जातात. त्यानंतर हे अमली पदार्थ देशात, तसेच विदेशात वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले जातात. एक किलो कोकेनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 10 कोटीपर्यंत असू शकते, अशी माहिती देण्यात आली.
अथक प्रयत्न
भारतातील तरुण वर्ग अमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये, यासाठी केंद्र सरकार आणि अमली पदार्थ विरोधी दल अथक प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारने कठोर धोरण या संदर्भात अवलंबिले आहे. केंद्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावरही या दृष्टीने अनेक प्रयत्न केले जात आहे. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यांमध्ये अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या अनेक टोळ्यांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच हजारो किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अमली पदार्थांचे संकट पूर्णत: संपेपर्यंत हे अभियान संपणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले असून अमली पदार्थ विरोधी दलाने मुख्यत: गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि पंजाब या राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पंजाब राज्यात अशा पदार्थांचा खप लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अमली पदार्थांच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून दहशतवाद, हिंसाचार आणि अशांतता माजविणाऱ्या संघटनांचे भरण पोषण केले जाते, असेही प्रतिपादन पोलिसांनी केले.