21 कोटीचे ड्रग्ज बेंगळुरात जप्त
बेंगळूर : बेंगळूरच्या केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर साठविण्यात आलेला ड्रग्जसाठा जप्त केला. याप्रकरणी नायजेरीयन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. लियोनार्डो ओक्वुडीली असे त्याचे नाव आहे. त्याच्याजवळून 21 कोटी रुपये किमतीचे 16 किलो एमडीएमए क्रिस्टल, 500 ग्रॅम कोकेन, मोबाईल व इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. राममूर्तीनगर येथे ड्रग्ज विक्री करण्यात येत असल्याचा सुगावा लागताच सीसीबी पोलिसांनी छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी लियोनार्डो हा वर्षभरापूर्वी व्यापारी व्हिसा मिळवून भारतात आला होता. राममूर्तीनगरमध्ये भाडोत्री घर घेऊन त्याने ड्रग्जविक्री सुरू केली होती. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर ड्रग्जविक्रीचे प्रयत्न त्याने चालविले होते. त्याचे प्रयत्न उधळून लावण्यात सीसीबी पोलीस यशस्वी ठरले आहेत.