मुक्ततेपूर्वी ओलिसांना देण्यात आले ड्रग्ज
हमासचा क्रूरपणा उघड : जगासमोर आनंदी दाखविण्याचा होता उद्देश वृत्तसंस्था
जेरूसलेम
हमासने मुक्ततेपूर्वी संबंधित ओलिसांना ड्रग्ज दिले होते अशी माहिती इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने संसदेला दिली आहे. सर्व ओलीस तंदुरुस्त आणि अत्यंत आनंदी असल्याचे दाखविण्यासाठी हमासने हा क्रूरपणा केला होता. या ओलिसांचा कैदेत असताना धोकादायक पद्धतीने छळ करण्यात आला होता.
मुक्तता झालेल्यांपैकी अनेक जण अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाहीत. तसेच त्यांना या स्थितीतून बाहेर काढणे अत्यंत अवघड असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने वेस्ट बँकेत पॅलेस्टिनींना लक्ष्य करणाऱ्या कट्टरवादी इस्रायलींना व्हिसा देणार नसल्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेने एक महिन्यापूर्वी इस्रायली नागरिकांसाठी व्हिसारहित प्रवेशाची घोषणा केली होती. वेस्ट बँकेत पॅलेस्टिनींवर होत असलेले हल्ले पाहता अमेरिकेच्या प्रशासनाने नवा निर्णय घेतला आहे. याच्या अंतर्गत यापूर्वीच अमेरिकेचा व्हिसा मिळविलेल्या कट्टरवादी ज्यूंचा व्हिसा रद्द केला जाणार आहे.
लेबनॉनची मागितली माफी
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांसोबतच्या संघर्षादरम्यान इस्रायली सैनिकांकडून लेबनॉनचा एक सैनिक मारला गेला आहे. इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या तळावर हल्ले केले होते, परंतु यात लेबनॉनचे अनेक सैनिक जखमी झाले आणि यातील एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आयडीएफने लेबनॉनची माफी मागितली आहे.
मुक्ततेचा सध्या कुठलाच मार्ग नाही
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी हमासकडून मुक्तता करण्यात आलेले नागरिक आणि अद्याप ओलीस असलेल्या लोकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. ओलिसांना परत आणण्याचा सध्या कुठलाच मार्ग नाही. शस्त्रसंधी इस्रायलने नव्हे तर हमासने संपुष्टात आणली आहे. हमासने ठेवलेल्या अटी मान्य करणे शक्य नव्हते असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.