For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमलीपदार्थांचे सेवन-तस्करीविरोधात जनजागृती

12:40 PM Jun 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमलीपदार्थांचे सेवन तस्करीविरोधात जनजागृती
Advertisement

आंतरराष्ट्रीय जागरुकता दिनी आयोजित रॅलीत संस्था-संघटनांचा सहभाग : कार्यक्षेत्रातील विविध शाळा-कॉलेजना भेटी देऊन मार्गदर्शन

Advertisement

बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) च्या विद्यमाने आणि अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए) बेळगाव यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थांचे सेवन आणि तस्करीविरोधी आंतरराष्ट्रीय दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या सुरुवातीला जितोचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी रॅलीला अधिकृतपणे हिरवा झेंडा दाखवला आणि रॅलीच्या शेवटपर्यंत सहभागी होऊन सर्वांना प्रेरणा दिली.

जागतिक पातळीवर अमलीपदार्थांच्या गैरवापराचा सामना करण्यासाठी या महत्त्वाच्या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नांचा एक भाग म्हणून शहरात ही जागरुकता रॅली आयोजित करण्यात आली होती. ही रॅली राणी चन्नम्मा चौकाजवळील कन्नड साहित्य भवन येथून सकाळी 8.30 वाजता सुरू झाली आणि डॉ. आंबेडकर रोड, कोल्हापूर सर्कलमार्गे केएलई शताब्दी केंद्राजवळ संपली.

Advertisement

या जागरुकता रॅलीमध्ये उपऔषध नियंत्रक नागराज, साहाय्यक औषध नियंत्रक के. मल्लिकार्जुन, रघुराम एन., मनोहर, औषध निरीक्षक रेणूप्रसाद आणि बेळगावच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाचे दयानंद, जितो सचिव अभय आदिमनी, कार्यक्रम समन्वयक डॉ. देवेगौडा इमागौड यांच्यासह जितो सदस्य उपस्थित होते. या रॅलीमध्ये बेळगाव रिटेल ट्रेडर्स अँड होलसेल ड्रग असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच केएलई राणी चन्नम्मा फार्मसी कॉलेज, मराठा मंडळ फार्मसी कॉलेज, श्री पॅरामेडिकल, भरतेश नर्सिंग कॉलेज आणि विविध संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

आयएमईआरमध्ये अमलीपदार्थ विरोधी दिन

केएलएस आयएमईआर व टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अमलीपदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सीपीआय परशुराम पुजारी व पीएसआय विश्वनाथ वेरे उपस्थित होते. यावेळी एमबीए विद्यार्थ्यांनी समाजाला अमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी व अमली पदार्थमुक्त वातावरणाला प्रोत्साहन देण्याची शपथ घेतली. अमली पदार्थांमुळे आपल्यावर विपरित परिणाम होऊन धोका उद्भवू शकतो. तसेच व्यक्ती व समाजाला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. यामुळे युवापिढीने अमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली अंगीकारावी. अमलीपदार्थांचे सेवन रोखण्यासाठी व निरोगी समाजासाठी व्यक्ती, कुटुंब व समाजाकडून सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मान्यवरांनी सांगितले. यावेळी आयएमईआरचे संचालक डॉ. आरिफ शेख यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. जॉर्ज रोड्रिग्ज, साक्षी तेंडोलकर, अतुल कणबरकर यांनी सूत्रसंचालन केले.

हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाकडून अमलीपदार्थ दुष्परिणामांविषयी जागृती

आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर हिरेबागेवाडी पोलिसांनी अमलीपदार्थांच्या दुष्परिणामांविषयी गुरुवारी जागृती केली. कार्यक्षेत्रातील शाळा-कॉलेजना भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय., बी. के. मिटगार आदींनी के. के. कोप येथील एस. सी. अंगडी पदवी कॉलेज, हलगा येथील भरतेश नर्सिंग कॉलेज, हिरेबागेवाडी येथील बसवेश्वर सर्कल, ग्रामपंचायत आदी ठिकाणी भेटी देऊन अमलीपदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी माहिती दिली.

Advertisement
Tags :

.