पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन
संशय हा जवळपास प्रत्येक माणसाचा स्थायीभाव आहे. विशेषत: काही नाती तर अशी असतात की, तेथे संशयाच्या भुताचा मुक्त संचार असतो. पती आणि पत्नी हे असे एक नाते आहे. आपली पत्नी आपल्या अनुपस्थितीत काय करते, हे जाणून घेण्याची इच्छा अनेक विवाहित पुरुषांची असते. तर विवाहित स्त्रियाही आपल्या पतींसंबंधी बरेच संशय मनात बाळगून असतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या अनेक मार्गांचा अवलंब करीत असतात, असे दिसून येते.
सध्या ड्रोन हा अनेक संदर्भांभध्ये परवलीचा शब्द झाला आहे. अनेक कामांसाठी ड्रोनचा उपयोग केला जातो. चीनच्या ‘मध्य हुबेई’ या प्रांतात एका पतीने आपल्या पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा उपयोग करण्याची शक्क्ल लढविली. आपण घराबाहेर गेल्यानंतर घरावर लक्ष ठेवण्यासाठी एका ड्रोनची सोय केली. या माणसाच नाव जियांग असल्याचे सांगितले जात आहे. आपली पत्नी आपल्या अनुपस्थितीत अन्य कोणाच्या सहवासात असते असा संयश निर्माण झाल्याने त्याने सत्य जाणून घेण्यासाठी अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा उपाय केला.
त्याचा संशय खरा ठरविण्याची कृती या ड्रोनने केली. तो घराबाहेर गेल्यानंतर त्याची पत्नी अन्य एका पुरुषाबरोबर एका कारमध्ये बसून दूरच्या भागात गेली. ड्रोनच्या माध्यमातून आपल्यावर लक्ष ठेवले जात आहे हे तिच्या लक्षात आले नाही. ड्रोनने कारचा पाठलाग केला. दूरच्या एका शहरात त्याची पत्नी त्या पुरुषाबरोबर एका घरात गेल्याचे आणि काही काळानंतर बाहेर पडल्याचे त्याला ड्रोनमुळे समजले. आपला नेहमीचा ‘कार्यक्रम’ करुन पत्नी त्याच्या कारखान्यात आली. या ड्रोनने दिलेल्या फूटेजचा उपयोग आता अशा पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी आपल्याला होईल, अशी या पतीला शाश्वती वाटते. त्याच्या हाती हा पुरावा आहे.