किनारी नियम उल्लंघनांचे ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय : प्रारंभी उत्तर गोव्यावर लक्ष केंद्रीत
पणजी : उत्तर गोव्यात किनारी भागात सतत होणारी बेकायदेशीर बांधकामे आणि विद्यमान हॉटेल्स व आस्थापनांचा बेकायदेशीर विस्तार तसेच त्यातून प्रक्रिया न केलेले सांडपाणी समुद्रात सोडण्यासारखी उल्लंघने सतत होत असतात. या समस्येचा सामना करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आता ड्रोनचा वापर करणार असून त्याद्वारे उत्तर गोव्यातील संपूर्ण किनारपट्टीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पेडणे तालुक्यातील तेरेखोलपासून तिसवाडी तालुक्यातील आगशी समुद्रकिनाऱ्यापर्यंतच्या भागात हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्यासंदर्भात मंडळाने यापूर्वीच निविदा जारी केली असून पुढील महिन्याभरात हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. सदर भागात आतापर्यंत बेकायदेशीररित्या अनेक हॉटेल्सचे बांधकाम किंवा विस्तार करण्यात आले आहेत. सध्यस्थितीत या उल्लंघनांचे जमिनीवरून सर्वेक्षण करणे अशक्यप्राय अशीच गोष्ट आहे. त्यामुळेच ड्रोनचा पर्याय निवडण्यात आला असून त्याद्वारे प्राप्त माहितीच्या आधारावर मंडळाला पुढील कृती करणे सहज साध्य होणार आहे.
या सर्वेक्षणानंतर दक्षिण गोव्यातही अशाच प्रकारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र सध्या मंडळाने संपूर्ण लक्ष उत्तर गोव्यावर केंद्रीत केले आहे. या जिह्यात हणजुणे, वागातोर, बागा, कळंगूट आणि कांदोळी या पट्ट्यात सर्वाधिक बेकायदेशीरपणा दिसून आला आहे. दरम्यान, किनारीपट्ट्यांचे निरीक्षण करण्यासाठी अवलंबिली जाणारी ही ड्रोन सर्वेक्षण प्रक्रिया यशस्वी ठरल्यास भविष्यात त्याच पद्धतीने खाण क्षेत्रांवरही लक्ष ठेवता येणार असून त्यादृष्टीनेही मंडळाने विचार चालविला आहे. भविष्यात किनारी भागात परवानग्या देण्यासाठी ड्रोन इमेजरी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे. ड्रोन सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्या भागातील सांडपाणी निचरा व्यवस्थेची माहिती मिळविण्यातही मंडळाला मदत होणार आहे. यापूर्वी विनाप्रक्रिया सांडपाणी समुद्रात सोडण्याचे प्रकार निदर्शनास आल्यामुळे न्यायालयाने मंडळाला धारेवर धरले होते. त्याचा परिणाम म्हणून नंतर गत पर्यटन हंगामात मंडळाने अनेक शॅकवर कारवाई केली होती.