पिकांवर फवारणीसाठी ड्रोनचा आधार
शेतीसाठी आधुनिक पद्धत : काही मिनिटात फवारणी : शेतकऱ्यांना वरदान : ड्रोन वापरण्याविषयी कृषी खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद
बेळगाव : अलीकडे शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. यामधूनच अलीकडच्या काही दिवसांमध्ये ड्रोन औषध फवारणीचा पर्याय समोर येऊ लागला आहे. शेकडो एकर शेती पिकांवर औषध फवारणी करणे शक्य होऊ लागले आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी शेतकऱ्यांना आधार ठरू लागली आहे. कृषी खात्यानेही ड्रोन वापरण्याविषयी सकारात्मकता दर्शवली आहे. आधुनिक शेती पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत भरघोस उत्पादन घेणे शक्य होऊ लागले आहे. ड्रोनच्या साहाय्याने कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होऊन पिकांना मात्रा देखील योग्य प्रमाणात मिळते. अलीकडे शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी ओला तर कधी सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत नवीन प्रयोग म्हणून ड्रोनचा वापर हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे शेतीही हायटेक होऊ लागली आहे.
जसजसे आधुनिकीकरण होऊ लागले आहे, तसतसे शेतीतही बदल होऊ लागले आहेत. अलीकडे शेतीतील पिकांवर ड्रोनचा उपयोग करून औषध फवारणी करण्याचे नवे तंत्र अवगत झाले आहे. खरीप हंगामात ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग, रताळी, मका आदी पिकांची लागवड आणि पेरणी करण्यात आली आहे. या पिकांमध्ये ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करणे शक्य होऊ लागले आहे. विशेषत: दहा-पंधरा फूट वाढलेल्या उसावर किंवा इतर पिकांवरही फवारणी होऊ शकते. बांधावर थांबून ड्रोनच्या साहाय्याने औषधाची मात्रा दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्याला पिकात उतरण्याचीही गरज नाही. त्यामुळे साप, विंचू आणि इतर कीटकांपासूनही धोका निर्माण होत नाही. अलीकडे ड्रोनच्या साहाय्याने औषधाची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी वाढू लागली आहे. साधारण 15 मिनिटांच्या कालावधीत एक एकरपर्यंत क्षेत्रात फवारणी होते.
आधुनिक ड्रोन यंत्राचा वापर सोयीस्कर
शेतीत मजूर मिळत नाहीत, पावसाची अनिश्चितता, सुरळीत वीजपुरवठा नाही अशा एक ना अनेक कारणांमुळे शेती अडचणीत येऊ लागली आहे. अशा परिस्थितीत आधुनिक ड्रोन यंत्राचा वापर सोयीस्कर ठरू लागला आहे. त्यामुळे ड्रोन भाडोत्री घेऊन शेतीवर फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. शेतीचे क्षेत्र अधिक असल्यास जादा वेळ लागतो. मात्र, या ड्रोनद्वारे काही मिनिटातच फवारणी करणे शक्य होऊ लागले आहे. त्यामुळे याकडे शेतकऱ्यांचा कलही वाढू लागला आहे. शेतकऱ्यांमध्ये या यंत्राविषयी जागृती निर्माण झाली असून अडचणीच्या ठिकाणी किंवा पावसाळ्यात देखील या यंत्राचा अधिक वापर होऊ लागला आहे. या ड्रोनद्वारे औषध आणि कीटकनाशकांची फवारणी करणे सोयीस्कर होऊ लागले आहे.
विषबाधेचा धोका टळला
पिकांवर औषध फवारणी करताना विषबाधा होऊन दरवर्षी दुर्घटना घडत होत्या. यात शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू होत होता. ड्रोन फवारणीमुळे अशा घटना टाळता येणे शक्य आहे. कोणताही धोका पोहोचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ड्रोन फवारणी फायदेशीर ठरू लागली आहे.
ड्रोन फवारणीचे फायदे
- औषध पिकांच्या पानांवर पडते
- वेळेची व श्रमाची बचत होते
- औषधाचे प्रमाण कमी लागते
- विषबाधेचा धोका पोहोचत नाही
- साप, विंचू व इतरांपासून धोका टळतो
फवारणी करण्यासाठी ड्रोन उपयुक्त
शेती पिकांवर फवारणी करण्यासाठी ड्रोन उपयुक्त आहे. कमी वेळेत आणि कमी श्रमात फवारणी शक्य आहे. केवळ 10 मिनिटात आणि दहा लिटर पाण्यात एक एकर फवारणी करता येते. ऊस, सोयाबीन आणि इतर सर्वच पिकांवर काही मिनिटात फवारणी शक्य होऊ लागले आहे.
-सी. एस. नाईक (कृषी अधिकारी उचगाव)