म्यानमारमध्ये नागा उग्रवाद्यांवर ड्रोन स्ट्राइक
भारतविरोधी वरिष्ठ नेता पी आंग माईचा मृत्यू
वृत्तसंस्था/ नेपीडॉ
भारत आणि म्यानमार सीमेवर उग्रवादी कारवायांमुळे स्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण झाली आहे. म्यानमारमधील नागा उग्रवादी गट एनएससीएन (के-वायए)च्या तळांवर भीषण ड्रोन हल्ला झाला आहे. हा ड्रोन स्ट्राइक अत्यंत अधिक शक्तिशाली होता, ज्यात एकाचवेळी अनेक तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. म्यानमारच्या सगाइंग क्षेत्रात हा ड्रोन स्ट्राइक करण्यात आला असून यात नागा उग्रवादी समुहाचा सीनियर कमांडर आणि स्वत:ला मेजर जनरल म्हणवून घेणऱ्या पी. आंग माईचा मृत्यू झाल्याचे समजते.
हाय-प्रिसिजन गायडेड ड्रोनद्वारे अनेक बॉम्ब पाडविण्यात आल्याने उग्रवाद्यांचा कमांड पोस्ट आणि आसपासच्या इमारती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. आंग माई या हल्ल्यात मारला गेला असावा, परंतु याची अधिकृत पुष्टी आतापर्यंत झालेली नाही. हल्ल्यानंतर त्याचा कमांड युनिटसोबतचा संपर्क पूर्णपणे तुटला असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
एनएससीएन (के-वायए) तळ लक्ष्य
काही महिन्यांच्या आत हा दुसरा मोठा ड्रोन स्ट्राइक करण्यात आला आहे. यापूर्वी जुलै महिन्यात भारत-म्यानमार सीमेवर अशाचप्रकारच्या ड्रोन हल्ल्यांद्वारे उग्रवादी गट उल्फा-आय, एनएससीएन (के)च्या युंग आंग आणि आंग माई गटांच्या अनेक ठिकाणांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत उल्फा-आयचे तीन वरिष्ठ कमांडर ज्यात नयन आसोम, गणेश आसोम आणि प्रदीप आसोम मारले गेले होते. एनएससीएन(के)चे देखील काही कमांडर यात ठार झाले हेते. पारंपरिक जमिनीवरील कारवाईऐवजी अशा उग्रवादी गटांच्या विरोधात आता ड्रोनद्वारे प्रिसिजन स्ट्राइक केले जात असल्याने त्यांचे नेटवर्क नष्ट होत आहे.
ड्रोन स्ट्राइक हा एक कॉर्डिनेटेड क्रॉस बॉर्डर ऑपरेशन असल्याचा दावा अनेक उग्रवादी संघटनांनी केला आहे, परंतु भारताकडून याविषयी कुठलेच अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. म्यानमारच्या सगाइंग क्षेत्रात वाक्थम वस्ती, होयात वस्ती आणि पांगसाउ पासनजीक असलेल्या उग्रवादी गटांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. या क्षेत्रात भारत-म्यानमार सीमा अत्यंत संवेदनशील असून मागील काही वर्षांपासून हे क्षेत्र नागा आणि आसामच्या उग्रवादी गटांसाठी आश्रयस्थळ ठरले आहे. या उग्रवादी गटांच्या तळांना नष्ट करण्यासाठी भारत दीर्घकाळापासून म्यानमारमधील अंतरिम सरकार आणि स्थानिक सशस्त्र गटांसोबत मिळून काम करत आहे.
उग्रवादी घटनांमध्ये वाढ
मागील काही महिन्यांपासून भारत-म्यानमार सीमेवर उग्रवादी घटना वाढविण्याचा प्रयत्न झाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी आसाम रायफल्सच्या एका शिबिरावर उल्फा-आय आणि एनएससीएन (के-वायए)च्या उग्रवाद्यांनी अरुणाचल प्रदेशच्या चांगलांग जिल्ह्यातील हाटमान गावानजीक हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर सीमावर्ती भागांमध्ये अधिक सतर्कता बाळगली जात आहे.