भारत-पाक सीमेवर हेरॉईनसह ड्रोन जप्त
पोलीस-बीएसएफची संयुक्त कारवाई
चंदीगढ / वृत्तसंस्था
पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर गेल्या आठवडाभरापासून तस्करांनी ड्रोनद्वारे शस्त्रे आणि अमली पदार्थ पाठविण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. या कारनाम्यांवर अचूक लक्ष ठेवत त्यांचा नापाक हेतू हाणून पाडला जात आहे. तरनतारण जिह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळ रविवारी पुन्हा एकदा सुरक्षा दलांनी तीन किलो हेरॉइनसह एक ड्रोन जप्त केले. पंजाब पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाकडून ही करण्यात आली आहे.
तरनतारणमधील सीमापार तस्करीच्या जाळय़ाविरुद्ध विशेष मोहीम राबवत असताना, पोलीस आणि बीएसएफने संयुक्त कारवाईत तीन किलो हेरॉईनसह क्वाडकॉप्टर ड्रोन जप्त केल्याचे पोलीस अधिकाऱयांनी रविवारी सांगितले. यापूर्वी फाजिल्का जिह्यात पाकिस्तानी ड्रोनने पाडलेले सुमारे 25 किलो हेरॉईन सीमा सुरक्षा दलाने जप्त केले होते. याशिवाय बीएसएफने सोमवारी अमृतसर आणि तरनतारण येथे भारत-पाकिस्तान सीमेवर सुमारे 10 किलो हेरॉईन वाहून नेणारे दोन पाकिस्तानी ड्रोन पाडले होते.