म्हैसूर दसऱ्यातील ड्रोन प्रदर्शनाने वेधले गिनीजचे लक्ष
दसरोत्सवातील वाघाच्या कलाकृतीने रचला जागतिक विक्रम
बेंगळूर : यंदाच्या जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा उत्सवावेळी ड्रोन प्रदर्शनाने मैलाचा दगड गाठला आहे.येथील ड्रोन प्रदर्शनाने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 24 नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या संदर्भात पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. त्यात म्हैसूर येथे रात्रीच्या आकाशात 2,983 ड्रोन्सच्या साहाय्याने वाघाची एक आश्चर्यकारक प्रतिमा तयार करण्यात आली, असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘नाड हब्ब’ म्हणून म्हैसूर दसऱ्याची ओळख आहे. हा कर्नाटकातील सर्वात भव्य आणि चिरस्थायी सांस्कृतिक उत्सवांपैकी एक आहे. या उत्सवाची भव्यता, ऐतिहासिक महत्त्व आणि सर्व समुदायांमध्ये उत्सवाच्या वातावरणासाठी प्रशंसा झाली आहे.
आमच्या लोकांसाठी संस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी विविध प्रदर्शने भरविली जातात, असे ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज म्हटले आहे. चामुंडेश्वरी वीज पुरवठा निगम (चेस्कॉम)चे व्यवस्थापकीय संचालक के. एम. मुनिगोपाल राजू म्हणाले, या वर्षी म्हैसूर दसरोत्सवावेळी ड्रोन प्रदर्शनात सुमारे 3000 ड्रोन वापरण्यात आले. गिनीज अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी वाघाची प्रतिमा सुमारे 3,000 ड्रोन वापरून तयार करण्यात आली होती. ड्रोन शोसाठी चेस्कॉमने बोटलॅब डायनॅमिक्सशी भागीदारी केली होती, असे ते म्हणाले. कलाकृतींमध्ये सौरमंडळ, जगाचा नकाशा, देशाचा अभिमानी सैनिक, मोर, राष्ट्रीय प्राणी वाघ, डॉल्फिन, गरुड, सर्पावर नाचणारे भगवान कृष्ण, कावेरी माता, सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांचे चित्र समाविष्ट असणारा कर्नाटकचा नकाशा, गॅरंटी योजना, कर्नाटकचा नकाशा, चामुंडेश्वरी देवी यांचा समावेश होता. चार दिवसांच्या ड्रोन शोवर सुमारे 3 कोटी रु. खर्च आल्याचे त्यांनी सांगितले.