फ्लायड्रो अकॅडमीतर्फे ड्रोन नियंत्रण प्रशिक्षण केंद्र
डीजीसीएची मान्यता, सांबरा विमानतळावर कार्यालय
बेळगाव : एएमएक्स ड्रोन कंपनीने व्यावसायिक ड्रोन तंत्रज्ञान आणि डीजीसीए मान्यताप्राप्त ड्रोन नियंत्रण प्रशिक्षण सुरू केले आहे. कृषी,सर्वेक्षण आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानयुक्त ड्रोनची निर्मिती एएमएक्स ड्रोन कंपनीतर्फे केली जात आहे. बेळगावमध्ये या कंपनीचे प्रशिक्षण केंद्र सुरू झाले असून युवकांना हे प्रशिक्षण घेणे सुलभ होणार असल्याची माहिती कंपनीचे सहसंस्थापक व सीईओ केदार यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अचूकता आणि विश्वासार्हता ही या ड्रोनची वैशिष्ट्यो आहेत. विविध क्षेत्रांमधील ग्राहकांच्या गरजांनुसार ड्रोनचे उत्पादन केले जाते. मेक इन इंडिया अभियानांतर्गत विविध प्रकारच्या वापरासाठी अतिप्रगत तंत्रज्ञान वापरून उच्च दर्जाचे ड्रोन एएमएक्स कंपनी भारतामध्ये उत्पादित करीत आहे. तज्ञ ड्रोन चालकांना विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. याचा विचार करून फ्लायड्रो अकॅडमीने सांबरा विमानतळावर ड्रोन नियंत्रण प्रशिक्षण केंद्र सुरू केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
रोजगाराच्या संधी उपलब्ध
फ्लायड्रो अकॅडमी ही डीजीसीए (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) कडून मान्यताप्राप्त संस्था असून अत्युत्तम प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये विविध प्रकाराच्या कामांसाठी ड्रोनचा वापर सुरक्षितरीत्या आणि कार्यक्षमतेने कसा करावा? हे शिकविले जाते. सध्या ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. युवावर्गाला योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते यामधून रोजगार मिळवून शकतात अथवा स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात.
फ्लायड्रो अकॅडमीचे सांबरा विमानतळावर प्रशिक्षण केंद्र सुरू
फ्लायड्रो अकॅडमीने बेळगावच्या सांबरा विमानतळावर प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या ड्रोनची माहिती तसेच त्यांचे नियंत्रण प्रात्यक्षिकासह दिले जाणार असल्याचे केदार यांनी सांगितले.