नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना आता घरपोच चलन
रस्त्यावरील तपासणीला तूर्तास ब्रेक : खड्डे बुजविण्याचाही प्रयत्न करणार, पोलीस आयुक्तांची माहिती
बेळगाव : रस्त्यावर वाहने अडवून कागदपत्रांची तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्याचे प्रकार तूर्त थांबविण्याचा निर्णय पोलीस दलाने घेतला आहे. रस्त्यावर वाहने अडविण्यापेक्षा ट्रॅफिक मॅनेजमेंट सेंटरच्या मदतीने वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना घरपोच किंवा ऑनलाईन चलन पाठविण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी ही माहिती दिली आहे. रस्त्यावर वाहन तपासणी थांबविल्यामुळे त्यासाठी लागणारे पोलीस बळ वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून सुमारे 90 टक्के तपासणी थांबविल्यामुळे त्यासाठीचे पोलीस बळ शहरातील वेगवेगळ्या भागात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वापरले जाणार आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंट सेंटर व स्मार्ट सिटीचे संपूर्ण शहरात कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर नजर ठेवण्यात येणार आहे.
याबरोबरच पोलिसांचे बॉडीवोर्न कॅमेरेही असणार आहेत. नियम मोडणाऱ्यांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यापेक्षा दंडाचे चलन त्यांना ऑनलाईन पाठविण्यात येणार आहे. याबरोबरच बेळगाव परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांची यादी तयार करण्याचे कामही पोलिसांनी हाती घेतले आहे. ही यादी संबंधित खात्यांना सोपवून खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे. प्रत्येकाने हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवावी. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. जोरात वाहने चालविल्यामुळे पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडण्याची शक्यता असते. वाहनचालकांनी पादचाऱ्यांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. मटका, जुगार व अमलीपदार्थांची विक्री थोपविण्यासह आता वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचे काम पोलीस आयुक्तांनी हाती घेतले आहे. वाहतूक विभागात पोलिसांची कमतरता आहे. ती दूर करण्यासाठी रस्त्यावर वाहने अडविण्याचा प्रकार बंद करून कॅमेऱ्यांच्या मदतीने नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांना चलन पाठविण्याची सूचना वाहतूक विभागाला करण्यात आली आहे.