शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा
सततच्या कोंडीने वाहनचालक वैतागले
बेळगाव : बेळगाव शहरात सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. बेशिस्त पद्धतीने रस्त्याशेजारी लावलेली वाहने, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, रिक्षावाल्याचा आततायीपणा यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. मंगळवारी बाजारपेठ बंद असतानाही शहराच्या अधिकतर भागात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. खडेबाजार कॉर्नर-गणपत गल्ली, खडेबाजार-मध्यवर्ती बसस्थानक कॉर्नर, नरगुंदकर भावे चौक, रामदेव गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, अनंतशयन गल्ली कॉर्नर ते जत्तीमठ, कलमठ रोड, रविवारपेठ, शनिमंदिर, या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पोलिसांनी नागरिकांना शिस्त लावण्याची गरज
दुचाकी, चारचाकी वाहनांच्या बेशिस्त पद्धतीने करण्यात आलेल्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. त्यातच फळविक्रेते, भाजीविक्रेते, फेरीवाले, उसाचा रस विकणाऱ्या हातगाड्या, रस्त्यामध्येच ठाण मांडून असल्याने वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढली आहे. अनसुरकर गल्ली कॉर्नर ते जत्तीमठपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुला दुचाकीचे पार्किंग त्यातच रस विकणाऱ्या हातगाड्या यामुळे नेहमीच कोंडी होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीपर्यंत रहदारी पोलिसांकडून विभागवार फेऱ्या मारल्या जात होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजुने पांढऱ्या पट्ट्याच्या पुढे हातगाड्या, तसेच भाजीविक्री व फळ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती. परंतु मागील काही दिवसात हे थांबले असल्याने आपल्या मर्जीप्रमाणे वाहनांचे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे आता पुन्हा पोलिसांनीच नागरिकांनी शिस्त लावण्याची गरज आहे.