चालक नसलेला ट्रक घुसला खाऊगल्लीत
जुना कळंबा नाका परिसरातील घटना
खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दोन हातगाड्यांचे नुकसान
सुदैवाने कोणतीही जिवितहानी नाही
कोल्हापूर
चालक नसलेला ट्रक रविवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास जुना कळंबा नाका येथील खाऊगल्लीत घुसला. यामध्ये येथील खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दोन हातगाड्यांचे मोठे नुकसान झाले. सकाळी येथे नाष्टा करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते, पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
जुना कळंबा नाका परिसरातील खाऊगल्लीसमोरच पदपथलागून खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या उभ्या असतात. येथे वडा, पोहे, आंबोळी इडली, मिसळ अशा विविध पदार्थांची विक्री केली जाते. त्यामुळे येथे सकाळी 6 वाजल्यापासूनच नाष्टा करण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी असते. रविवारी सकाळीही येथे नाष्टा करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास येथील सुर्यकांत मंगल कार्यालयाच्या दिशेने एक ट्रक विना चालक येताना दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. येथील एका वडापाव विक्रीच्या गाड्याला धडक देवून पुढे असलेल्या एका चिकन 65 च्या गाड्याला ट्रकची जोरात धडक बसली. धडकेते दोन्ही हातगाड्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने येथील चिकन 65 विक्रीचा गाडा बंद असल्याने कोणतीही जिवितहानी झाली आहे. येथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.