Accident News : दोन वाहनांमध्ये सापडून चालक जागीच ठार, मिरज MIDC तील धक्कादायक घटना
दुसरे चालक सागर कोलेकर यांनी तुझा ट्रक पुढे येत आहे, असे सांगितले.
कुपवाड : मिरज एमआयडीसीतील सेंट्रल वेअर हाऊस येथे ट्रक थांबविण्यासाठी ट्रकमध्ये चढत असताना दोन्ही वाहनांच्या मधोमध सापडून एक चालक ठार झाल्याची घटना रविवारी घडली. यामध्ये राजू परशुराम मादर (वय ३७रा. धामणी ता.मिरज) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून अपघातास कारणीभूत मयत राजू परशुराम मादर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. फिर्याद बीळ्यानसिद्ध दत्तात्रय बडेल (३५, रा. ब्राम्हनाळ ता. मिरज) यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज एमआयडीसीतील सेंट्रल वेअर हाऊस येथे रविवारी मादर हे आपल्या ताब्यातील ट्रक (क्रमांक एमएच ११ एएल ४३३४) धान्य उतरण्याची जागा बघण्यासाठी खाली उतरत होते. यावेळी दुसरे चालक सागर कोलेकर यांनी तुझा ट्रक पुढे येत आहे, असे सांगितले.
यावेळी राजू मादर हे ट्रक थांबविण्यासाठी ट्रकमध्ये चढत असताना रस्त्यालगत बाजुस थांबलेले वाहन (क्रमांक एम.ए ४७ बीएल ७५३७) आणि स्वतःच्या ताब्यातील ट्रक यामध्ये ते सापडले. यावेळी त्यांना गंभीर दुखापत झाली. कोलेकर यांनी मादर यांना सेवासदन हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. घडलेल्या अपघातास ट्रकचालक मादरच कारणीभूत म्हणून त्यांच्याविरुद्ध कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.