राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर दृष्टीतर्फे ‘नो स्विम झोन’, ‘नो सेल्फी झोन’ जाहीर
प्रतिनिधी/ पणजी
समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटक, प्रवासी तसेच स्थानिक लोकांना सावध करण्यासाठी तसेच बुडण्यापासून वाचवण्यासाठी दृष्टी मरीन कंपनीतर्फे ‘नो स्विम झोन’ आणि ‘नो सेल्फी झोन’ अधोरेखित करण्यात आले आहेत. तसेच तेथे तशी सूचना देणारे फलकही लावण्यात आले आहेत. त्या सूचनांचे पालन केल्यास समुद्रात बुडून कोणाचेही बळी जाणार नाहीत, अशी खात्री कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
दक्षिण गोव्यातील विविध समुद्रकिनारी मिळून एकूण 27 ठिकाणी आणि उत्तर गोव्यातील 18 ठिकाणी कंपनीचे जीवरक्षक सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत तैनात असतात. दुधसागर तसेच मये तलावाकडेही त्यांची हजेरी असते. सुमारे 450 जीवरक्षकांचा ताफा संपूर्ण किनारपट्टीवर नेमण्यात आला असून बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करतात. या 2023 वर्षभरात आतापर्यंत एकूण 400 जणांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आल्याची महिती देण्यात आली.
उत्तर गोव्यातील विविध समुद्रकिनारी 49 ‘नो स्विम झोन’ तर 33 ‘नो सेल्फी झोन’ अधोरेखित करण्यात आले आहेत. दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर 40 नो स्विम झोन तर 19 नो सेल्फी झोन अधोरेखित केले आहेत. कंपनीने सुरक्षित ‘स्विम झोन’ देखील अधोरेखित केले आहेत. ज्या ठिकाणी पोहोणे सुरक्षित आहे तेथे लाल व पवळ्या रंगाचा संयुक्त ध्वज लावण्यात आला आहे. जेथे धोका आहे तेथे फक्त लाल रंगाचा ध्वज लावण्यात आला आहे. पर्यटक प्रवासी तसेच स्थानिक लोकांनी समुद्रकिनारी फलकांचे त्यावरील सूचनांचे तसेच ध्वजाचा रंग ओळखून सावध व्हावे, पालन करावे असे आवाहन दृष्टी मरीन कंपनीने केले आहे.