बापाला पडलेले स्वप्न ठरले चिमुकल्यांचा कर्दनकाळ
कंग्राळी खुर्द येथील दोन मुलींच्या खूनप्रकरणी सरकारी वकिलांची माहिती
बेळगाव : कोरोनामुळे कर्ज झाले, त्या कर्जातून अंधश्रद्धेकडे वळलेल्या बापाने दोन चिमुकल्यांचा खून केला होता. बापाला पडलेले स्वप्न त्या चिमुकल्यांचा कर्दनकाळ ठरले. मुलींचा बळी देऊन त्यांचे रक्त शिवलिंगाला वाहिले तर कर्जमुक्त होशील, असे बापाला स्वप्न पडले. या अंध़श्रद्धेत शिरलेल्या बापाने पोटच्या तान्हुल्यांचा खून केला. त्यावेळी कोणीच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. मात्र एफएसएल-विधीविज्ञानच्या अहवालावरून चिमुकल्यांचा खून करणाऱ्या त्या नराधम बापाला जन्मठेपची शिक्षा झाली, अशी माहिती न्यायालयात युक्तिवाद केलेल्या सरकारी वकील नसरीन बंकापूर यांनी दिली.
रामनगर-कंग्राळी खुर्द येथे 2021 मध्ये ही घटना घडली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली. आरोपी अनिल चंद्रकांत बांदेकर (रा. रामनगर, कंग्राळी) याने आपल्या मुली अंजली (वय 8), अनन्या (वय 4) या दोन्ही मुलींना विष पाजून खून केला होता. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे रक्त शिवलिंगाला घातले होते. त्या रक्ताचे नमुने पोलिसांनी घेतले होते. याचबरोबर पंचनामा करताना त्या मुलींचे रक्त घेण्यात आले होते. याप्रकरणी डॉक्टरांनी न्यायालयामध्ये एफएसएलचा अहवाल दाखल केला होता. याचबरोबर न्यायालयामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिली होती. नराधम बापाने अंधश्रद्धेतून या दोन्ही मुलींचा विष पाजून खून केला होता. या घटनेमुळे सारेच हादरले होते. याप्रकरणी या मुलींची आई जया बांदेकर यांनी एपीएमसी पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी योग्य तपास करून आरोपी अनिल याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
सहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केले. त्याठिकाणी संपूर्ण अहवाल डॉक्टरांनी योग्यप्रकारे सादर केला आणि न्यायालयासमोर माहिती दिली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही डॉक्टरांच्या अहवालामुळे आणि माहितीमुळेच त्या आरोपीला शिक्षा झाल्याचे सरकारी वकील नसरीन बंकापूर यांनी सांगितले. बऱ्याचवेळा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे संशयितांची सुटका होत असते. मात्र एफएसएलच्या अहवालावरून त्याला जन्मठेपची शिक्षा न्यायाधीशांनी दिली आहे.