कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वप्नपूर्ती...18 वर्षांनंतरची !

06:00 AM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रत्येक ‘आयपीएल’ आल्यानंतर उपस्थित व्हायचा तो ‘आरसीबी’ला जेतेपद कधी पटकावता येईल का हा प्रश्न...पण विराट कोहलीसह एकाहून एक दिग्गज खेळाडू पदरी असूनही अखेरीस चाहत्यांच्या पदरी पडायची ती निराशाच...18 वर्षं हा सिलसिला चालू राहिल्यानंतर यंदा त्या प्रतीक्षेसमोर पूर्णविराम लागलाय. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचं नाव सुद्धा अखेर जेत्यांच्या यादीत समाविष्ट झालंय...

Advertisement

18 एप्रिल 2008...‘ते’ ‘आयपीएल’मधील पहिला सामना खेळले होते ‘कोलकाता नाईट रायडर्स’विऊद्ध. ‘त्यांना’ चषक उचलून जल्लोष करण्याची संधी मिळाली ती त्यानंतर तब्बल 6255 दिवसांनी, ‘आयपीएल’ नि ‘चॅम्पियन्स लीग’मध्ये मिळून 286 सामने खेळल्यानंतर...यादरम्यान तीन वेळा हातातोंडाशी येऊन ‘आयपीएल’चं जेतेपद हुकलं. 2009 मध्ये निराश व्हावं लागलं ते अवघ्या सहा धावांनी...2011 साली ‘ते’ पुरते चीत झाले, तर 2016 मध्ये पराभव पत्करावा लागला तो आठ धावांनी...पण यंदा अहमदाबादमधील 91 हजारांहून अधिक प्रेक्षकांसमोर त्यांनी ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या जेतेपदाची 17 वर्षांची दीर्घ प्रतीक्षा संपविली...अन् एकच जयघोष झाला तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा...

Advertisement

मग विलक्षण प्रकाशझोत पडला तो संघातील दोन खेळाडूंवर...18 वर्षं ‘आरसीबी’शी एकनिष्ठ राहिलेला विराट कोहली अन् कर्णधार म्हणून पदार्पणातच ‘आयपीएल’चा किताब पटकावून शेन वॉर्न (2008-राजस्थान रॉयल्स), रोहित शर्मा (2013-मुंबई इंडियन्स) व हार्दिक पंड्याच्या (2022-गुजरात टायटन्स) रांगेत जाऊन बसलेला रजत पाटिदार...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची 19 वर्षांखालील विश्वचषक, चॅम्पियन्स करंडक, टी-20 विश्वचषक आणि एकदिवसीय सामन्यांचा विश्वकरंडक अशी प्रत्येक स्पर्धा जिंकणाऱ्या विराट कोहलीच्या तिजोरीत नव्हतं ते फक्त ‘इंडियन प्रीमियर लीग’चं जेतेपद...विराट त्या चषकाच्या जवळ पोहोचला तो यापूर्वी तब्बल तीन वेळा. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला प्रत्येक वेळी शेवटचा अडथळा ओलांडणं शक्य झालं नव्हतं. परंतु त्या 36 वर्षीय महान खेळाडूला पुन्हा एकदा चषक उचलण्याची संधी मिळाली अन् अंतिम सामन्यात 35 चेंडूत 43 धावा नोंदवत त्यानं ती हातची जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली...

यंदा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या संघात चषक जिंकण्याची ताकद आहे हे स्पष्ट दिसत होतं. त्यांनी केलेली कामगिरी एखाद्या जेत्याप्रमाणंच होती...विराट कोहली ‘आरसीबी’मध्ये सामील झाला तो स्पर्धेला प्रारंभ झाला तेव्हाच. कसोटी क्रिकेटमधून हल्लीच निवृत्त झालेल्या त्या खेळाडूनं बेंगळूरच्या संघाला सातत्यानं पुढं नेण्याचा गेल्या 18 वर्षांत अक्षरश: प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. विश्लेषकांच्या मते, त्याची कारकीर्द अजूनही संपलेली नसून त्याच्यात क्षमता आहे ती आणखी बरीच मजल मारण्याची...विराटचं पडद्याआडचा कर्णधार असं वर्णन केल्यासही ते चुकीचं ठरणार नाहीये. दक्षिण आफ्रिकेचा व ‘आरसीबी’चा माजी दिग्गज खेळाडू नि कोहलीचा परममित्र ए. बी. डिव्हिलयर्सच्या मते, यंदा त्यानं खेळावर 100 टक्के लक्ष केंद्रीत केलं असंच चित्र दिसलं...

अंतिम लढतीपूर्वी डिव्हिलियर्सनं म्हटलं होतं की, अजूनपर्यंत परीक्षेचा पेपर पूर्ण झालेला नसला, तरी त्याला पूर्ण विश्वास आहे तो विराट कोहलीच्या मुसंडी मारण्याच्या क्षमतेवर...कोहलीच्या दृष्टीनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर म्हणजे त्याच्या ‘आयपीएल’ व क्रिकेट कारकिर्दीतील एक फार मोठा प्रवास. त्यानं 2013 ते 2021 पर्यंत संघाचं नेतृत्व केलं आणि 2016 मध्ये उपविजेतेपद मिळविलं...काही वर्षांपूर्वीच्या ‘आरसीबी’ चमूचा विचार केल्यास अनिल कुंबळे, डॅनियल व्हेट्टोरी, ख्रिस गेल, ए. बी. डिव्हिलियर्स आणि फाफ डू प्लेसिससारख्या अनुभवी तसंच गुणवान खेळाडूंची त्याला साथ मिळाली. परंतु यंदा मात्र विराटच्या अनुभवाशी स्पर्धा करणारा अन्य एकही खेळाडू संघात नव्हता...

पण विराट कोहली या परिस्थितीची पर्वा न करता झुंजला आणि विशेष म्हणजे त्यानं रजत पाटिदारला कर्णधार म्हणून जम बसविण्याची अगदी व्यवस्थित संधी दिली. खेरीज उपकर्णधार जितेश शर्माला देखील बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं...फिल सॉल्ट नि (सॉल्टच्या अनुपस्थितीत) जेकब बेथेल यांच्याबरोबर डावाला प्रारंभ करणारा कोहली जवळपास प्रत्येक वेळी सुरेख पद्धतीनं खेळला नि ‘गेमचेंजर’ देखील ठरला...त्याच्यापेक्षा वयानं लहान असलेल्या खेळाडूंनी दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला तो आक्रमक खेळाचा, तर विराटनं बचाव व आक्रमण यांचा लाजवाब मिलाफ घडविला. त्यानं 15 सामन्यांत 657 धावा जमविल्या त्या 54.75 च्या सरासरीनं व 144.71 च्या ‘स्ट्राईक रेट’नं...

विराट कोहलीनं साखळी फेरीतील पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीत नाबाद 73 धावांची खेळी केली होती आणि दर्जाच्या दृष्टीनं विचार केल्यास तोच त्याचा सर्वोत्तम डाव. त्यानं एकूण आठ अर्धशतकं झळकावली अन् संपूर्ण स्पर्धेत  हाणले ते 66 चौकार नि 19 षटकार...ऑस्ट्रेलियाचा नामवंत जदलगती गोलंदाज हेझलवूड व स्पर्धेत खेळू न शकलेला देवदत्त पडिक्कल यांच्या अनुपस्थितीत सर्व वादळांना तोंड देणं ‘आरसीबी’ला शक्य झालं ते विराटमुळंच. गेल्या वर्षी झालेल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये सर्वांत जास्त 714 धावा फटकावणारा हा खेळाडू आता त्याच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलाय हे खरं असलं, तरी 2008 साली म्हणजेच स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी दिसलेली आग अजूनही कमी झालेली नाहीये !

2024 सालची सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 स्पर्धेची अंतिम फेरी आठवतेय ?...बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सदर सामना रंगला तो मुंबई व मध्यप्रदेश यांच्यात. त्यावेळी मध्यप्रदेशचं नेतृत्व केलं होतं ते ‘आरसीबी’शी संबंधित रजत पाटिदारनं. त्यामुळं साऱ्या स्टेडियमचं समर्थन मिळत होतं ते ‘एमपी’ला. परंतु पाटिदारनं 40 चेंडूंत 81 धावांची केलेली झंझावाती खेळी संघाला विजेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरली ती मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यर व त्याच्या साथीदारांमुळं...त्यानंतर पाच महिन्यांनी ‘आयपीएल’च्या अंतिम लढतीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकले ते हेच दोन्ही कर्णधार. ‘आरसीबी’ व ‘पंजाब किंग्स’ला त्यापूर्वी एकदाही ‘इंडियन प्रीमियर लीग’ जिंकणं शक्य न झाल्यानं दोघांवरही दबावाची तलवार लोंबकळत होती...

रजत पाटिदारला ‘आरसीबी’चा कर्णधार बनवणं हा काही लहरी निर्णय नव्हता. प्रमुख प्रशिक्षक अँडी फ्लॉवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाची शैली पाहिली होती आणि ‘आयपीएल’मधील सर्वांत लोकप्रिय संघांपैकी एकाचं अधिपत्य करण्याच्या दृष्टीनं आवश्यक अनेक गुण त्यांना त्याच्यात आढळले होते...लक्षणीय बाब म्हणजे पाटिदारनं 2024-25 हंगाम सुरू होण्यापूर्वी एखाद्या वरिष्ठ संघाचं नेतृत्व केव्हाही केलं नव्हतं आणि आता त्याच खेळाडूनं उपकर्णधार जितेश शर्माच्या साहाय्यानं ‘रॉयल चॅलेंजर्स’ला त्यांच्या इतिहासातील पहिलंवहिलं जेतेपद मिळवून दिलंय...अवकाशातल्या ग्रहांच्या करामतीचं वर्णन करणं कठीणच !

कर्णधार म्हणून रजत पाटिदारनं मैदानावर आक्रमक व्यक्तिमत्वाचं दर्शन घडविलेलं नसलं, तरी अय्यर मात्र त्याच्या खेळाडूंवर ओरडण्यास मागंपुढं पाहत नव्हता (पाटिदार अगदी तणावपूर्ण क्षणीही संयम राखर्तना दिसला. या गुणाचं प्रशिक्षक आणि तज्ञांकडून भरपूर कौतुक झालंय)...पत्रकार परिषदेत सुद्धा रजत व श्रेयस यांच्या अनुभवातील फरक स्पष्ट दिसला. रजत पाटिदार अजूनही धडे गिरवतोय, तर श्रेयस अय्यरनं उत्तरं कशा पद्धतीनं द्यायची याचं कौशल्य छान आत्मसात केलंय....

‘आरसीबी’च्या कर्णधाराकडे फार मोठा अनुभव नसला, तरी त्याला सल्ला देणाऱ्या ‘थिंक-टँक’चा भर राहिला तो खेळाडूंच्या वलयापेक्षा त्यांच्या कामगिरीवर...विशेष म्हणजे इतक्या ‘हाय-प्रोफाईल’ संघाचं, त्यातील दिग्गज खेळाडूंचं नेतृत्व करताना त्याच्यातील फलंदाज सुद्धा कोणत्याही टप्प्यावर दबला गेला नाही. यंदाच्या स्पर्धेत 14 डावांमध्ये 2 अर्धशतकांसह 312 धावा काढणाऱ्या रजतला हातून अधिक सातत्यपूर्ण कामगिरी घडताना पाहणं निश्चितच आवडलं असतं. परंतु अनेक सामन्यांमध्ये त्यानं त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं फिरकी गोलंदाजीचा घेतलेला समाचार नजरेआड करता येणार नाही...रविवारीच 32 वा वाढदिवस साजरा केलेल्या रजत पाटिदारला याहून दुसरी मौल्यवान भेट मिळूच शकली नसती इतकं मात्र खरं !

‘आरसीबी’चे अन्य शिल्पकार...

‘आरसीबी’चे ‘विराट’ पराक्रम...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article