यजमान वेस्ट इंडीजचा स्वप्नभंग!
विंडीजला नमवत आफ्रिका सेमीफायनलमध्ये : पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात आफ्रिका 3 गड्यांनी विजयी
वृत्तसंस्था/ अँटिग्वा
दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करत टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. डकवर्थ-लुईस नियमानुसार आफ्रिकेने हा सामना 3 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजने 20 षटकांत 8 गडी गमावून 135 धावा केल्या. दुसऱ्या डावात पाऊस सुरु झाला, त्यामुळे आफ्रिकेला 17 षटकांत 123 धावांचे लक्ष्य देण्यात आले, जे त्यांनी 16.1 षटकांत पूर्ण केले. सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला, ज्यामध्ये दोन्ही संघांनी जीवाची बाजी लावली पण शेवटी आफ्रिकेने बाजी मारली.
यजमान विंडीजने विजयासाठी दिलेल्या 136 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रिझा हेंड्रिक्सला आंद्रे रसेलने दुसऱ्याच षटकात बाद करत आफ्रिकेला धक्का दिला. हेंड्रिक्सला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर याच षटकातील शेवटच्या चेंडूवर रसेलने धोकादायक डी कॉकचा अडथळा दूर केला. डी कॉक 12 धावा करुन बाद झाला. यावेळी आफ्रिकन संघाची धावसंख्या 2 बाद 15 अशी होती. याचदरम्यान पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबल्यानंतर खेळ पुन्हा सुरु झाला तेव्हा षटके कमी करण्यात आली आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार आफ्रिकेला सुधारित लक्ष्य मिळाले.
123 धावांचे सुधारित लक्ष्य अन् आफ्रिकन फलंदाजांची भंबेरी
पावसाच्या व्यत्ययानंतर आफ्रिकेला 17 षटकांत 123 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचीही भंबेरी उडाली. पण तणावपूर्ण स्थितीत आफ्रिकेच्या फलंदाजांनी संयमाने खेळ करत बाजी मारली. 16 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कागिसो रबाडाने चौकार खेचला. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला 5 धावांची आवश्यकता होती. मार्को जॅन्सेनने ओबेद मकॉयच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सुरुवातीला झटपट विकेट पडल्यानंतर कर्णधार मार्करमही अपयशी ठरला. 18 धावांवर तो बाद झाला.
हेन्रिक क्लासेन आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी डाव सावरला. क्लासेनने गुडाकेश मोतीच्या षटकात 20 धावा वसूल केल्या. यामुळे लक्ष्य आटोक्यात आले. मात्र अल्झारी जोसेफच्या उसळत्या चेंडूवर क्लासेन बाद झाला. त्याने 22 धावा केल्या. यानंतर स्टब्सच्या साथीला डेव्हिड मिलर आला. फिनिशर मिलरला एकेक धावेसाठी संघर्ष करावा लागला. रॉस्टन चेसने त्याला त्रिफळाचीत केलं. चेसच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा स्टब्सचा प्रयत्न मेयर्सच्या हातात जाऊन विसावला. प्रमुख फलंदाज माघारी परतल्याने दक्षिण आफ्रिकेची चिंता वाढली. धावा आणि चेंडूचं प्रमाण नियंत्रणात असल्याने कागिसो रबाडा आणि मार्को जॅन्सेन यांनी संयमाने खेळ करत संघाला विजय मिळवून दिला.
विंडीज फलंदाजांची निराशा
नॉर्थ साऊंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आफ्रिकेने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकन गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवला व यजमान विंडीजला 20 षटकांत 8 बाद 135 धावांत रोखले. विंडीजच्या डावात रॉस्टन चेसने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. काईल मेयर्सने 35 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. रसेलने 15 धावा केल्या तर अल्झारी जोसेफ 11 धावांवर नाबाद राहिला. या चौघांचा अपवाद वगळता विंडीजच्या अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. कर्णधार रोव्हमन पॉवेलसह शाय होप, निकोलस पूरनसारखे दिग्गज खेळाडू या महत्वपूर्ण सामन्यात फ्लॉप ठरले, याचाच फटका विंडीजला बसला. आफ्रिकेकडून फिरकीपटू तबरेज शम्सीने 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज 20 षटकांत 8 बाद 135 (काईल मेयर्स 35, रॉस्टन चेस 42 चेंडूत 52, रसेल 15, शम्सी 27 धावांत 3 बळी, रबाडा, महाराज, मार्करम व जॅन्सेन प्रत्येकी एक बळी).
दक्षिण आफ्रिका 16.1 षटकांत 7 बाद 124 (डी कॉक 12, मार्करम 18, ट्रिस्टन स्टब्ज 29, क्लासेन 22, जॅन्सेन नाबाद 21, रॉस्टन चेस 3 बळी तर आंद्रे रसेल व जोसेफ प्रत्येकी दोन बळी).
वेस्ट इंडिज स्पर्धेबाहेर
यजमानपद मिळालेल्या वेस्ट इंडिजने यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये साखळी फेरीत सर्व सामने जिंकत थाटात सुपर-8 फेरी गाठली होती. पण सुपर 8 मध्ये त्यांना तीनपैकी दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना स्पर्धेबाहेरचा रस्ता धरावा लागला. सोमवारी आफ्रिकेविरुद्ध लढतीत त्यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले पण शेवटी त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. या गटातून दक्षिण आफ्रिका व इंग्लंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
रबाडा-जॅन्सेन यांच्यात टक्कर
दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज यांच्यात सुपर 8 चा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान मैदानावर अपघात घडला. आफ्रिकेचे दोन खेळाडू कागिसो रबाडा आणि मार्को जॅन्सेन झेल घेण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर एकमेकांना धडकले. टक्कर झाल्यानंतर दोन्ही खेळाडू मैदानावर वेदनेने तळमळताना दिसले. विंडीजच्या डावातील आठव्या षटकात ही घटना घडली. रबाडाच्या गुडघ्याला दुखापत झाली तर जॅन्सेनच्या छातीला आणि पोटाला मार लागला. फिजिओ टीम मैदानात आल्याने सामना काही काळ थांबवावा लागला. ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.