For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हवाई दलाच्या ताफ्यावरील हल्लेखोरांची रेखाचित्रे जारी

06:36 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
हवाई दलाच्या ताफ्यावरील हल्लेखोरांची रेखाचित्रे जारी
Advertisement

माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे बक्षीस

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांनी मोठे बक्षीस जाहीर केले आहे. दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच लष्कराने दोन दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी करत त्यांच्या अटकेसाठी व्यापक प्रयत्न चालवले आहेत. दरम्यान, हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणा या भागात सातत्याने शोधमोहीम राबवत आहे. दहशतवाद्यांना मतदानापूर्वी भीतीचे वातावरण निर्माण करायचे होते, असा दावा केला जात आहे.

Advertisement

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पूंछमधील भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानस्थित दहशतवादी अबू हमजा याच्या नेतृत्वाखालील गटाने हल्ला केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी एके असॉल्ट रायफल आणि अमेरिकन बनावटीच्या एम4 कार्बाइन्स आणि स्टील बुलेटने हा हल्ला केला. पूंछच्या सुरनकोटमध्ये शनिवारी संध्याकाळी दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनताफ्याला लक्ष्य करून हल्ला केला होता. या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला तर अन्य 4 जवान जखमी झाले. वाहनताफ्यात एकूण दोन वाहने होती. त्यापैकी एक लष्कराचे वाहन होते आणि दुसरे भारतीय हवाई दलाचे होते. यामध्ये दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनाला लक्ष्य करून गोळीबार केला होता.

पुंछ प्रदेश अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात येतो. अनंतनाग-राजौरीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत ही घटना सुरक्षा दलांसाठी मोठे आव्हान बनली आहे. दहशतवाद्यांच्या शोधार्थ भारतीय सुरक्षा दलाकडून ठिकठिकाणी चौक्मया उभारून तपासणी केली जात आहे.

शोपियानमध्ये शस्त्रास्त्रांसह दोघांना अटक

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमधील अलुरा इमामसाहेब येथे दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना पकडण्यात आले. लष्कराच्या 34 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या 178 व्या बटालियनच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक मॅगझिन, 8 राउंड आणि दोन चायनीज हँडग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.