पाटील गल्ली वडगाव येथे ड्रेनेजचे सांडपाणी विहिरींमध्ये
महानगरपालिकेचे दुर्लक्ष, टँकरद्वारे पाणी घेण्याची वेळ
बेळगाव : पाटील गल्ली, वडगाव येथे ड्रेनेज वाहिनी तुंबल्याने सांडपाणी विहिरांच्या पाण्यामध्ये मिसळले जात आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तक्रार केल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती केली जाते. परंतु, काही दिवसांनी पुन्हा ही समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विहिरींचे पाणी दूषित झाल्यामुळे नागरिकांना बाहेरून टँकरने पाणी आणावे लागत असल्याने ही समस्या तातडीने न सोडवल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला.
वॉर्ड क्र. 50 मध्ये येणाऱ्या पाटील गल्ली, वडगाव येथील मठ परिसरात मागील काही दिवसांपासून ड्रेनेज वाहिनी फुटल्याने सांडपाणी तुंबले आहे. याची तक्रार महानगरपालिकेकडे केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती केली. परंतु, वारंवार सांडपाणी तुंबून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. सांडपाणी जमिनीत झिरपत असल्यामुळे ते आसपासचे बोअरवेल तसेच विहिरींच्या पाण्यामध्ये मिसळले जात आहे. त्यामुळे विहिरींचे शुद्ध पाणी दूषित होत आहे.
विहिरी व बोअरवेलच्या पाण्याला सांडपाण्याचा वास येत असल्यामुळे त्याचा वापरही करता येत नाही. तसेच जनावरेही हे पाणी पित नाहीत. त्यामुळे पाटील गल्लीतील नागरिकांना बाहेरून टँकर घेऊन पाणी घ्यावे लागत आहे. टँकरद्वारे एक-दोन दिवस पाण्याची व्यवस्था होऊ शकते. परंतु, मनपा अधिकाऱ्यांनी ड्रेनेज वाहिनीची योग्य प्रकारे दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, अनंत पाटील, प्रशांत जाधव, सागर नागराळ, निंगाप्पा बाळनाईक, अनिल सपारे, रुपा पाटील, कमल जाधव, गिता नागराळ, मनीषा पाटील, शारदा पाटील यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.