For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोरदार पावसाने ड्रेनेज-गटारींची समस्या चव्हाट्यावर

10:31 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
जोरदार पावसाने ड्रेनेज गटारींची समस्या चव्हाट्यावर
Advertisement

दुकानात शिरले पाणी, व्यावसायिकांना फटका, गटारी तुंबल्या

Advertisement

बेळगाव : जोरदार पावसाने पाणी साचून शहर जलमय झाले आहे. विशेषत: ड्रेनेज आणि गटारींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाण्याचा निचरा थांबल्याने अनेक दुकानातून पाणी शिरले आहे. त्यामुळे व्यावसायिकांनाही लाखो रुपयांचा फटका बसला आहे. विशेषत: फोर्टरोड, जुना पीबी रोड येथे पाणी साचल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. महानगरपालिकेमार्फत केवळ तात्पुरती स्वच्छता मोहीम राबवून तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणीही स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे. शहरात मागील आठ दिवसांपासून पावसाचा जोर कायम सुरू आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले आहे. तर काही ठिकाणी पाण्याचा निचरा थांबल्याने स्थानिक व्यावसायिक आणि रहिवाशांची झोप उडाली आहे. गटारीतून प्लास्टिक, कचरा, कपडे, रबर आणि इतर टाकावू वस्तू अडकून राहिल्याने निचरा थांबला आहे. त्यामुळे अनेक दुकाने, ऑटो गॅरेज आणि स्पेअरपार्टच्या दुकानामध्ये पाणी शिरले आहे. काही दुकानांमध्ये मागील दोन दिवसापासून गुडघाभर पाणी कायम आहे. परिणामी दुकानातील साहित्य खराब होऊन आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाने साऱ्यांना 2019 च्या पावसाची आठवण करून दिली आहे.

मनपाने पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहीम हाती घेणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नसल्याने शहरातील गटारी आणि ड्रेनेजचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. अनेक गटारीतून कचरा साचून राहिल्याने गटारी तुंबल्या आहेत. तर काही ठिकाणी गटारीतील पाणी शेजारील दुकानांमध्ये शिरले आहे. त्यामुळे मनपाच्या उदासिन कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शहरातील लेंडी नाल्यातील पाण्याचा प्रवाह इतर रस्त्यावरुन दिसून येत आहे. नाल्यातील पाणी इतरत्र वाहत असल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. नाल्याची रुंदी कमी असल्याने निचरा होण्यास अडचणी येत आहेत. शिवाय प्लास्टिक आणि इतर कचरा साचून असल्याने परिस्थिती गंभीर बनू लागली आहे. दरवर्षी मोठ्या पावसाला सुरुवात झाली की, शहरातील पाणी निचऱ्याचा प्रश्न आवासून उभा ठाकत आहे. एकीकडे स्मार्टसिटीच्या गोष्टी होत आहेत. तर दुसरीकडे मात्र पावसाळ्यात शहराची दुर्दशा समोर येऊ लागली आहे. त्यामुळे शहर स्मार्ट नसले तरी चालेल मात्र नागरी सुविधा पुरवा, अशी ओरडही शहरवासियांतून होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.