फुलबाग गल्ली परिसरातील ड्रेनेज लाईन कामाला चालना
नागरिकांतून समाधान : ड्रेनेज काम संपल्यानंतर होणार रस्ताकाम
बेळगाव : फुलबाग गल्लीच्या जुन्या रस्त्याचे खोदकाम करून नवीन रस्ता करण्यास विलंब झाल्याने लोकप्रतिनिधी विरोधात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्याचबरोबर स्थानिकांच्या मागणीनुसार रस्ता करण्यापूर्वी ड्रेनेज लाईन घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नुकतेच आमदार असिफ सेठ यांच्या हस्ते पूजन करून नवीन ड्रेनेज लाईन घालण्याच्या कामाला चालना देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. आमदार असिफ सेठ यांच्या मतदारसंघात येणाऱ्या फुलबाग गल्लीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी जुना डांबरी रस्ता खोदण्यात आला होता.
दोन महिन्यांपूर्वी रस्त्याची खोदाई करून देखील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात न आल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, प्रत्यक्षात परिसरातील ड्रेनेज लाईन अत्यंत जुनी असल्याने पहिल्यांदा नवीन ड्रेनेज लाईन घालण्यात यावी. त्यानंतरच रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांतून केली जात होती. त्यामुळेच रस्त्याच्या कामाला विलंब झाल्याची बाब समोर आली आहे. नगरसेविका पूजा पाटील यांनी नवीन ड्रेनेज लाईनसाठी आमदार असिफ सेठ यांच्याकडे पाठपुरावा करून नवीन ड्रेनेज लाईन मंजूर करून घेतली आहे. सदर कामाचे पूजन नुकतेच करण्यात आले असून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे.