For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. उमरचे निवासस्थान आयईडीद्वारे उद्ध्वस्त

06:08 AM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
डॉ  उमरचे निवासस्थान आयईडीद्वारे उद्ध्वस्त
Advertisement

दिल्ली कारस्फोट प्रकरणी मोठी कारवाई : भावासह कुटुंबीयही ताब्यात, कसून चौकशी सुरू

Advertisement

वृत्तसंस्था/ पुलवामा

सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दिल्ली दहशतवादी स्फोट प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. उमर उन नबी याचे निवासस्थान आयईडी स्फोटाने उद्ध्वस्त केले आहे. देशातील दहशतवादी घटनांविरुद्ध मोदी सरकारच्या शून्य-सहिष्णुतेच्या धोरणानुसार ही कारवाई करण्यात आली. सुरक्षा दलांनी प्रथम संपूर्ण परिसराला वेढा घातल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. दरम्यान, एकीकडे काश्मीरमध्ये धाडसत्र सुरू असतानाच दुसरीकडे दिल्लीतूनही तपासाची चक्रे वेगाने फिरताना दिसत आहेत.

Advertisement

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवार, 10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या दहशतवादी डॉ. उमर नबी याचे पुलवामा येथील निवासस्थान गुरुवारी रात्री सुरक्षा दलांनी आयईडी स्फोटाने उडवून दिले. डीएनए मॅचिंगमुळे डॉ. उमर नबी हाच कारमध्ये होता हेदेखील स्पष्ट झाले आहे. उमर पुलवामाच्या कोइल भागात राहत होता. पोलिसांनी त्याच्या पालकांना आणि भावांना ताब्यात घेतले असून त्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.

हरियाणाच्या नूह येथून अमोनियम नायट्रेटची खरेदी

दिल्ली स्फोटाचा संबंध आता हरियाणाच्या नूह (मेवात) जिह्यातील पिंगवन क्षेत्राशी जोडण्यात आला आहे. स्फोटाची चौकशी करणाऱ्या दिल्ली तपास यंत्रणेने खत विक्रेता दिनेश सिंगला उर्फ डब्बू याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. डब्बूने अल फलाह विद्यापीठातील डॉ. मुझम्मिल शकील याला अमोनियम नायट्रेट बाळगण्याचा परवाना नसतानाही रेकॉर्डशिवाय पुरवल्याचा आरोप आहे. स्फोटके तयार करण्यासाठी या अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आल्याचे वृत्त आहे.

आणखी एक सीसीटीव्ही फुटेज उघड

दिल्ली दहशतवादी स्फोटाच्या तपासात महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. ताज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 10 नोव्हेंबरच्या पहाटे हरियाणाच्या नूह जिह्यातील फिरोजपूर झिरका येथील मेवात टोलवर डॉ. उमर उन नबी असल्याचे दिसून आले. दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, सहपोलीस आयुक्त मिलिंद डुंब्रे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सत्यतेची पुष्टी केली. यापूर्वी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुख्य आरोपी डॉ. उमर उन नबी आय-20 कारमधून बदरपूर सीमेवरून राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करताना दिसत असल्यामुळे सध्या सुरू असलेल्या स्फोटाच्या तपासात आरोपींभोवतीचा फास आणखी घट्ट झाला आहे.

दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात आतापर्यंत अनेक मोठे खुलासे झाले आहेत. गुरुवारी फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये या स्फोटाशी संबंधित आणखी एक कार आढळली. ही कार डॉ. शाहीन शाहिदच्या नावावर नोंदणीकृत आहे. डॉ. शाहीन हिला ‘व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल’ प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे.

सुरक्षा संस्थांनी दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी डॉ. उमर आणि डॉ. मुझम्मिल यांच्या डायरी जप्त केल्या आहेत. या डायरींमध्ये 8 ते 12 नोव्हेंबरच्या तारखा आहेत. यावरून याच काळात स्फोट घडवण्याची योजना आखली जात होती असे स्पष्ट होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डायरींमध्ये सुमारे 25 व्यक्तींची नावे असून त्यापैकी बहुतेक जम्मू काश्मीर आणि फरिदाबादचे रहिवासी आहेत.

.................

Advertisement
Tags :

.