डॉ. सुजित मिणचेकर, राहूल आवाडे शिंदे सेनेच्या वाटेवर ?
महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीलाही धक्का; माजी आमदार मिणचेकर आज मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता ; राहूल आवाडेंच्या भूमिकेकडें लक्ष
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहूल आवाडे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. डॉ. मिणचेकर आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यांच्यामध्ये पक्षप्रवेशा संदर्भात बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुती पाठोपाठ आता महाविकास आघाडीलाही फुटीचे धक्के बसणार आहेत. महाविकास, महायुतीमधून विधानसभा निवडणुक लढण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून निवडणुकीपुर्वी नेत्यांकडून सोईस्करपणे पक्ष बदलण्याचा युद्धपातळीवर हालचाली सुरु आहेत.
विधानसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापालय सुरुवात झाली आहे. महायुतीमधून भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहूल देसाई, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. तर भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (शरद पवार गट) प्रवेश करणार आहेत. तर अजित पवार गटाचे माजी आमदार के.पी. पाटील हे देखिल महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. महायुतीला एका पाठोपाठ एक धक्के बसत असताना आता महाविकास आघाडीलाही धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी कागल विधानसभा मतदार संघातून महायुतीचे आमदार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठींबा दिला आहे. तर ठाकरे गटाचेच डॉ. सुजित मिणचेकर हे देखिल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. तसेच महाविकास आघाडीचा आणखी एक नेता महायुतीमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे.
राहूल आवाडेंना मुख्यमंत्र्यांची खुली ऑफर
भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहूल आवाडे इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून भाजपकडुन निवडणुक लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र येथून भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर देखील इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपने आवाडे यांच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. तर लाडकी बहिण योजना सन्मान सोहळ्यानिमित्त नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येवून गेले. यादरम्यान आवाडे यांनी विमानतळ येथे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राहूल आवाडे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे भाजपकडुन निर्णय होत नसल्याने आवाडे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
नेत्यांच्या सोईस्कर उड्या, तरीही तिढा कायम
महाविकास, महायुतीमधून विधानसभा निवडणुक लढता येणार नाही हे लक्षात घेवून इच्छूक नेत्यांकडून पक्ष बदलण्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. राधानगरी विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता लक्षात घेवून अजित पवार गटाचे ए. वाय. पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला. तर माजी आमदार के. पी. पाटील हे देखिल महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनीच जाहीर केले आहे. याच मतदारसंघातील भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनीही पदाचा राजीनामा दिला असून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. महायुतीमधून महाविकास आघाडीमध्ये नेत्यांचे इनकमिंग सुरु असले तरी कोणती जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार हे अद्याप निश्चित झाले नसल्यामुळे उमेदवारीचा तिढा कायम आहे. हातकणंगलेमध्येही असेच चित्र असणार आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर महायुतीमध्ये दाखल होणार असले तरी हातकणंगलेच्या जागेबाबत जनसुराज्य आणि भाजपही आग्रही आहे. या मतदारसंघात सध्या दलितमित्र अशोकराव माने यांना महायुतीची उमेदवारी देण्याबाबत जोरदार चर्चा सुरु असून त्यांनी गेली पाच वर्षे तयारीदेखील केली आहे. त्यामुळे येथेही उमेदवारीचा तिढा कायम राहणार आहे.