For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. शां. ब. मुजुमदार: शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ

06:07 AM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
डॉ  शां  ब  मुजुमदार  शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ
Advertisement

पद्मश्री, पद्मभूषण, पुण्यभूषण आदि सन्मानांनी गौरवलेले डॉ. मुजुमदार 31 जुलै रोजी वयाची 90 वर्षे पूर्ण करून 91 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला आढावा...

Advertisement

या जगात कारणाशिवाय काही घडत नाही. मानवी जीवनात घडणाऱ्या घटना ठराविक क्रमानेच का घडाव्यात याचे उत्तर सापडणे कठीण असते. मळलेल्या वाटांवरून पुढे जात राहण्यात धन्यता मानणाऱ्यांचा समूह ठिकठिकाणी पाहायला मिळतो. पण आयुष्यामध्ये नवे मार्ग स्वीकारून वाट्याला येणाऱ्या प्रतिकुलतेचा आणि संकटांचा धैर्याने सामना करत वाटचाल करणाऱ्या व्यक्ती आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा उमटवितात. शिक्षण क्षेत्रात कर्तृत्वाचे उत्तुंग शिखर म्हणून ज्यांचा गौरवाने आणि अभिमानाने उल्लेख करावा त्यापैकी एक म्हणजे डॉ. शां. ब. मुजुमदार.

डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा जन्म कोल्हापूर संस्थानातील गडहिंग्लज या छोट्या गावात 31 जुलै 1935 साली झाला. त्यांचं शालेय शिक्षण गडहिंग्लज येथील म्युनिसीपाल्टीच्या शाळेत झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरातील राजाराम महाविद्यालयातून बीएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदवी केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातून ते प्रथम क्रमांकाने एम. एस्सी. झाले. नंतर सूक्ष्मजीवशास्त्र विषयात त्यांनी पी. एचडी. पूर्ण केली. त्यानंतर ‘जीवनस्पर्शी शिक्षणाचा कर्मवीर पॅटर्न’ निर्माण करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्राध्यापक म्हणून आपल्या शैक्षणिक कारकीर्दीला सुरुवात केली.

Advertisement

फर्ग्युसन महाविद्यालयात 20 वर्षे त्यांनी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच महाविद्यालयाचे रेक्टर म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. पुणे विद्यापीठाच्या कार्यकारिणी अधीसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळाचे ते अनेक वर्षे सभासद होते. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या परदेशी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सल्लागार पदही त्यांनी भूषवले.

याच दरम्यान त्यांच्याच वर्गातील एक विद्यार्थीनी संजीवनी निकम व डॉ. मुजुमदार यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले व दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. तसे पाहिले तर संजीवनी या मराठा समाजाच्या तर डॉ. मुजुमदार हे सारस्वत. त्याकाळी आंतरजातीय विवाह समाजाकडून स्वीकारले जात नसत. पण दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांचा विवाह झाला.

फर्ग्युसनच्या मुलांच्या वस्तीगृहाचे रेक्टर म्हणून कार्य पाहताना एक प्रसंग घडला. 1969 ची दिवाळीची सुट्टी होती. वस्तीगृहातील सर्व विद्यार्थी आपापल्या गावी गेले होते. एक स्कर्टमधली परदेशी मुलगी तिच्या मित्राला खिडकीतून काहीतरी द्यायची आणि निघून जायची. डॉ. मुजुमदार यांनी हे दोन-तीन दिवस पाहिलं आणि त्यांना ही काहीतरी भानगड आहे अशी शंका आली. त्यांनी खोलीचे दार ठोठावले. त्यांच्या नजरेस एक मॉरिशसचा विद्यार्थी आढळला. त्याला त्याची बहीण खिडकीमधून जेवणाचा डबा देत असे. खिडकीतून का तर मुलींना मुलांच्या वस्तीगृहात प्रवेश नव्हता. त्या मुलाचे नाव सखाराम. तो काविळीने आजारी पडलेला, अशक्त झालेला आणि चार पावलेही न चालता येणारा होता. दिवाळी सुट्टी असल्याने बरेच विद्यार्थी आपापल्या गावी गेले होते आणि मेस व कँटीन सुद्धा बंद होते. म्हणून त्याची बहिण त्याला जेवण तयार करून आणून देत असे.

या प्रसंगातून डॉ. मुजुमदार यांच्यातील रेक्टर जागा झाला. पुण्यात शिक्षणासाठी परदेशी विद्यार्थी किती आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत याचा डॉ. मुजुमदार शोध घेऊ लागले. त्यांनी निरनिराळ्या देशांच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या असे लक्षात आले की, प्रवेश, इंग्रजी भाषेचे अल्पज्ञान, खाण्यापिण्याच्या सवयी, निवासाची व्यवस्था या व अशा अनेक समस्या त्यांना भेडसावत असत. भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी करावे ही भावना त्यांच्यामध्ये जागृत झाली. सुरुवातीला एका सांस्कृतिक केंद्राची स्थापना 26 जानेवारी 1971 रोजी झाली. ‘सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र’ असे त्याचे नामकरण झाले व ‘वसुधैव कुटुम्बकम’ हे बोधवाक्य ठरले. दोन भिन्न वनस्पती अथवा प्राणी एकमेकांच्या समस्या जाणून घेतात व एकमेकांना मदत करतात आणि यातून ‘सहजीवन’ निर्माण होते. यालाच जीवशास्त्रामध्ये ‘सिम्बायोसिस’ असे म्हणतात.

एका सांस्कृतिक केंद्राचे रूपांतर 2002 साली आंतरराष्ट्रीय विद्यापीठात झाले. आज रोजी सिम्बॉयोसिसच्या विविध अभ्यासक्रमात शिक्षण देणाऱ्या 80 हून अधिक शाखा असून पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, नोएडा, इंदोर, हैदराबाद, बेंगळूर अशा विविध राज्यांमध्ये शाखा कार्यरत आहेत. मागील वर्षी हा विस्तार भारताबाहेर पोहोचला व दुबई येथे शैक्षणिक संस्था स्थापन झाली.

2019 मध्ये डॉ. मुजुमदार यांनी ‘आनंदी गोपाल’ हा चित्रपट पाहिला. या चित्रपटापासून केवळ मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे ही प्रेरणा डॉ. मुजुमदार यांना मिळाली. फेब्रुवारी 2021 मध्ये भारतातील तिसऱ्या व महाराष्ट्रातील पहिल्या केवळ मुलींसाठीच्या वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात झाली. सध्या येथे 150 मुली शिकत असून गुणवत्तेवर आधारित निवड झालेल्या पहिल्या पाच मुलींना ‘आनंदी गोपाळ’ शिष्यवृत्ती प्रदान केली जात आहे आणि या पाच मुलींचे शिक्षण मोफत होत आहे. हे महाविद्यालय सिम्बायोसिस रुग्णालय व संशोधन केंद्राशी संलग्न आहे. काही वर्षांपूर्वी सामाजिक जाणीव लक्षात घेऊन गडहिंग्लज तालुक्यातील हरळी या गावी ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या शाळेची निर्मिती केली. विशेष म्हणजे भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी दिल्ली-मुंबई-पुणे-कोल्हापूर-हरळी असा लांब पल्ल्याचा प्रवास करून या शाळेचे उद्घाटन केले व संपूर्ण तालुक्यातील सुमारे 5 हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान एका अपंग विद्यार्थ्याला व्यासपीठावर बोलावले व त्याचाही सन्मान केला.

1897 साली स्वामी विवेकानंद यांनी दोन भाकीतं केली होती. त्यापैकी पहिलं भाकित म्हणजे पुढील 50 वर्षात भारताला स्वातंत्र्य मिळेल आणि हे भाकीत 1947 साली खरे ठरले. त्यांनी केलेलं दुसरं भाकीत म्हणजे 20 वे शतक पाश्चात्त्य देशांचे असले तरी एकविसावे शतक भारताचे असेल.

मला असे वाटते की, स्वामी विवेकानंदांचे दुसरे भाकीत खरे ठरण्याची दाट शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रात भारत विश्वगुरू होईल. त्यासाठी शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल करावे लागतील. आज जग हे विश्वग्राम झाले आहे. ते केवळ विज्ञान व तंत्रज्ञानामुळे. आपण क्षणार्धात जगातील कोणत्याही व्यक्तीशी आज संपर्क साधू शकतो. संपर्क साधनांमुळे लोक शरीरानं जवळ आले पण त्यांची मनं, विचार आणि आचार अजूनही भिन्न आहेत. भारत जर विश्वगुरू व्हायचा असेल तर ते शिक्षणाच्या माध्यमातूनच साध्य होईल. त्यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीत प्राचीन भारतातील रामायण, महाभारत, उपनिषद, भगवत्गीता यामध्ये असलेलं शहाणपण आणि पाश्चात्य देशात असलेले तत्त्वज्ञान व प्रगती यांचा संगम होणे आवश्यक आहे.ज्यावेळी भारत जगद्गुरु होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना साकार होईल. शिक्षणाच्या माध्यमातून ‘विश्व पदवीधर’ आणि ‘विश्व नागरिक’ निर्माण करणे हे डॉ. मुजुमदार यांचे स्वप्न आहे. ही स्वप्नपूर्ती होण्यासाठी त्यांची पत्नी सौ. संजीवनी, मोठी कन्या विद्या येरवडेकर, धाकटी कन्या डॉ. स्वाती मुजुमदार, जावई डॉ. राजीव येरवडेकर हे सर्व प्रयत्नशील आहेत आणि मोलाचे योगदान देत आहेत.

-उपेंद्र खाडिलकर

Advertisement
Tags :

.