मराठा मंडळ संस्थेतर्फे डॉ.राजश्री नागराजू यांचा सत्कार
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा मंडळ संस्थेतर्फे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन काही दिवसांपूर्वी कर्नाटक राज्य सरकारच्यावतीने त्यांना राज्योत्सव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले होते. संस्थेचे संचालक तसेच विविध शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचा सत्कार केला.
प्रारंभी जिजामाता हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. उपकार्यकारी विश्वस्त रामचंद्र मोदगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. संस्थेचे उपाध्यक्ष दिनकर ओऊळकर यांच्या हस्ते डॉ. राजश्री नागराजू यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी समिती सदस्य नागेश झंगरूचे यांनी डॉ. राजश्री यांच्या कार्याचा आढावा घेत शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना डॉ. राजश्री नागराजू म्हणाल्या, हा सत्कार केवळ माझा नसून संस्थेतील प्रत्येक सदस्याचा आहे. बेळगावमधील सर्व भाषिकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हा सन्मान होऊ शकला. यापुढील काळातही शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संचालक लक्ष्मण सैनुचे, नागेश तरळे, एम. डी. जाधव, उर्मिलाबाई तरळे, शिवाजी पाटील, पी. आर. गुरव, विनायक घसारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेज, डेंटल कॉलेज, फार्मसी कॉलेज, इंग्रजी मीडियम स्कूल, पीयू कॉलेज, डिग्री कॉलेज, जिजामाता हायस्कूल, मराठा मंडळ हायस्कूल, सेंट्रल हायस्कूल आदी शाळांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. प्र्रा. आशा थोरवी यांनी आभार मानले.