‘डॉ.प्रभाकर कोरे को-ऑप.’ला 25.30 कोटींचा नफा
अध्यक्ष महांतेश पाटील यांची माहिती : राज्यभरात 55 शाखा सेवेत : आणखी 30 शाखा लवकरच सुरू करणार
बेळगाव : अंकली येथील डॉ. प्रभाकर कोरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी या बहुराज्य संस्थेच्या राज्यात 55 शाखा असून 2024-25 या आर्थिक वर्षात 92 टक्के कर्ज वसूल करून 25.30 कोटींचा निव्वळ नफा मिळविला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महांतेश पाटील यांनी दिली. संस्थेच्या कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष पाटील बोलत होते. 1989 मध्ये विजापूरच्या ज्ञानयोगाश्रमाचे स्वर्गीय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते अंकली येथे सोसायटीचा शुभारंभ झाला. संस्थापक डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अमित कोरे आणि प्रीती दोडवाड यांच्या नेतृत्वात संस्थेचे कार्य सुरू आहे. संस्थेच्या 55 शाखांतून कार्य सुरू असून ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या गरजा भागविण्याचे काम संस्था करीत आहे. संस्थेचे 97,727 सदस्य आहेत, 4 कोटीहून अधिक शेअर भांडवल आहे, 141 कोटीहून अधिक निधी संकलन केले आहे. तसेच 1511 कोटींहून अधिक ठेवी संग्रहित केल्या आहेत. 1064 कोटींहून अधिक कर्ज वितरण केले आहे. खेळते भांडवल 1657 कोटींहून अधिक आहे. संस्थेच्या 25 कोटी ऊ. किमतीच्या स्वत:च्या 8 वास्तू असून भविष्यात सर्व शाखांना स्वत:ची वास्तू उपलब्ध करून देण्याचे संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना शेती अवजारे खरेदी करण्यासाठी, शालेय वाहन खरेदीसाठी, गरजूंना गृहकर्ज अत्यंत कमी व्याज दराने वितरित केले आहे. संस्थेतर्फे सोने तारण कर्ज त्वरित व अल्प व्याज दरात वितरित करण्यात येते. सोसायटीच्या सदस्यांसाठी सेफ लॉकर व्यवस्था, मोबाईल रिचार्ज, पॅन कार्ड, पासपोर्ट, इ-स्टॅम्प, आरटीसी (उतारे), बस, रेल्वे, फ्लाईट तिकीट रिझर्वेशन, आरटीजीएस, एनइएफटी सुविधा आहेत. सदस्यांसाठी 1 लाखापर्यंत अपघात विमा त्याचबरोबर सामान्य आरोग्य व आयुर्विमा महाम़ंड़ळाशी करार करून सुविधा देत आहे. संस्था आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सामान्य व आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून देत आहे. संस्थेमध्ये 64 पिग्मी कलेक्टर कार्यरत आहेत. संस्था आपली व्याप्ती वाढविण्याच्या प्रयत्नात असून लवकरच महाराष्ट्र आणि कर्नाटकात 30 हून अधिक शाखा सुरू करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. उपाध्यक्ष सिद्दगौडा मगदूम, संचालिका प्रीती दोडवाड, संचालक मल्लिकार्जुन कोरे, अण्णासाब संकेश्वरी, बसनगौडा असंगी, सुकुमार चौगुले, पिंटू हिरेकुरबर, अमित जाधव, प्रफुल्ल शेट्टी, अशोक चौगुला, बाळप्पा उमराणी, अनिल पाटील, शोभा जकाते, शैलजा पाटील, पार्वती धरनायक, जयश्री मेदार, श्रीकांत उमराणे, विवेकानंद कमते, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र करोशी व कर्मचारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.