डॉ. किरण ठाकुर यांच्या कृतज्ञता सोहळ्यास प्रारंभ
साताऱ्याचे सभागृह युवकांच्या घोषणांनी दणाणले : वक्ते मोहन शेटे यांच्यासह शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान
सातारा : तरुण भारतचे सल्लागार संपादक, लोकमान्य मल्टिपर्पजचे संस्थापक डॉ. किरण ठाकुर यांचा वाढदिवस राजधानी साताऱ्यात होणार असल्याचे जाहीर होताच संपूर्ण जिल्ह्यात उत्साह होता. त्याचा प्रत्यय वाढदिवस सोहळ्याच्या समारंभालाच आला. तरुणांसाठी आयोजित ‘छत्रपती शिवराय, आजचा युवक’ या प्रथम पुष्पाने सभागृहाच्या गर्दीचे उच्चांक मोडित काढला. सोहळ्याच्या शुभारंभास मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे सोमवार दि. 7 रोजीच्या मुख्य कार्यक्रमाचे आकर्षण आणखी वाढले आहे.
डॉ. किरण ठाकुर यांचा वाढदिवस राजधानी सातारा येथे आयोजित करण्याचा आग्रह पूर्ण झाला तेंव्हाच जिल्ह्याच्यावतीने सोहळा समिती आयोजित करण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व विद्यमान लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यासह माजी मंत्री, राज्यपालांनी आपणहून समर्थता दाखविली. साताऱ्यातील वाढदिवस सोहळा ‘तरुण भारत-लोकमान्य’च्या सहकार्याने डॉ. किरण ठाकुर वाढदिवस सोहळा समिती यांच्यावतीने साजरा होत आहे. या समितीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्यापासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विद्यमान मंत्री महोदय आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे.
वाढदिवस सोहळ्याचा शुभारंभ युवकांसाठीच्या पहिल्या पुष्पाने होणार होता. यासाठी वक्ते मोहन शेटे आणि ज्येष्ठ शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. सकाळी 11 वाजता नियोजित असलेल्या या पहिल्या पुष्पाला युवकांनी सकाळी 9 पासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती. नियोजित वेळेपूर्वीच सभागृह खचाखच भरले होते. डॉ. किरण ठाकुर वाढदिवस सोहळ्याच्या पहिल्या पुष्पाचे इतक्या दिमाखात स्वागत झाले की, सोहळ्याचा मुख्य दिवस सोमवार दि. 7 एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते 10 या वेळात सातारकर किती भव्य प्रतिसाद देतील याची सातारकरांना प्रचिती आली. सुनील मोरे यांनी आभार मानले.
शिवव्याख्यानातून छत्रपतींच्या पराक्रमाच्या तोफा धडाडल्या
डॉ. किरण ठाकुर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आपण उभे आहोत हे आपले भाग्यच आहे. आज या सोहळ्याची सुरुवात करताना युवक-युवतींची एवढी गर्दी मी पहिल्यांदाच अनुभवली. नितीन बानगुडे पाटील आणि मोहन शेटे यांच्या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या तोफा शब्दांच्या रूपातून धडाडल्या. जगातील आदर्श राजा म्हणून आपण महाराजांकडे पाहतो. आजच्या तरुणाईने त्यांच्या जीवनकार्यातील एक गुण अमलात आणला तरी त्यांचे जीवन सार्थकी लागेल. वास्तविक आत्ताची परिस्थिती अशी आहे की, राष्ट्र प्रथम ही संकल्पना पुढे आली की आपण एकत्र असतो. मात्र ही संकल्पना दूर झाली की आपण दुभंगलो जातो ही खंत आहे. एक युनोमध्ये निवडणुकीला उभे राहिलेल्या शशी थरूर यांना विचारले की ब्रिटिश नसते तर देशावर कोणाचे राज्य असते तर त्यांनी बेधडकपणे सांगितले की मराठ्यांचे राज्य असते. मराठा किती तऱ्हेने लढला. त्या काळातही लढला आणि या काळातही लढतोय. बेळगावात मराठा लाईट इन्फंट्री आहे. मराठा लाईट इन्फंट्रीने या शतकात कोणते शौर्य गाजविले आहे हे शब्दात सांगता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आजही आपले स्फूर्तिस्थान आहेत. मराठा लाईट इन्फंट्रीतील जवान आजही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन प्रत्येक युद्धात संघर्ष करतो, असे त्यांनी सांगितले.
76 मिनिटांच्या भाषणात 26 वेळा टाळ्या अन् 9 वेळा हशा...
शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानातील शब्दांच्या धारेने सभागृह पुरते स्तब्ध झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढलेल्या लढाया आणि मुघलांच्या साम्राज्याला वेळोवेळी दिलेला धक्का हे सांगताना जीवाच्या आकांताने बानगुडे पाटील हे दाखले देत होते. 76 मिनिटांच्या भाषणप्रसंगी सभागृहातील प्रत्येकाने तब्बल 26 वेळा टाळ्यांचा कडकडाट केला तर अनेक मजेशीर घटना ऐकताना 9 वेळा अख्खे सभागृह खळखळून हसले.