आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त उद्या डॉ.किरण ठाकुर यांचे व्याख्यान
‘सीमाप्रश्न-आचार्य अत्रे यांचे योगदान’ या विषयावर मांडणार विचार
मुंबई : आचार्य अत्रे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीबरोबरच सीमाप्रश्न लढ्यातही महत्त्वाचे योगदान राहिले आहे. अत्रे यांच्या याच कार्याची महती सांगण्यासाठी ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांचे ‘सीमाप्रश्न व आचार्य अत्रे यांचे योगदान’ या विषयावर उद्या 13 ऑगस्ट रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आचार्य अत्रे यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समिती मुलूंड यांच्यावतीने सायंकाळी 5.30 वाजता मराठा मंडळ सभागृह मुलुंड (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे यांचे मोठे योगदान राहिले आहे, त्यांच्या नावाशिवाय या लढ्याचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. मात्र संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर 1 मे 1960 नंतर बेळगाव-कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, यासाठी आचार्य अत्रे हे सीमाप्रश्नासाठी संघर्ष करत राहिले. मोर्चे, लढे आयोजित करत राहिले.
मात्र अत्रे यांच्या या कार्याबद्दलची माहिती म्हणावी तशी लोकांपर्यंत पोहचली नाही. म्हणूनच ‘सीमाप्रश्न आणि आचार्य अत्रे यांचे योगदान’ या विषयावर सीमाप्रश्नासाठी आजही अग्रणी असणारे तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. डॉ. ठाकुर यांचे अत्रे यांच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध असून, आचार्य अत्रे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जे जे उपक्रम राबविण्यात आले त्यात डॉ. किरण ठाकुर यांचा नेहमीच मोलाचा वाटा राहिला आहे. आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समिती, मुलुंड यांनी हे वर्ष शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सांगता वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आचार्य अत्रे यांनी सीमाप्रश्नासाठी दिलेले योगदान हा विषय त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निवडण्यात आला आहे. 125 व्या जयंतीची पूर्तता म्हणून 125 आंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय वक्तृत्व महोत्सव आयोजित केला आहे. तऊण पिढीने सीमाप्रश्नाचा अभ्यास करावा म्हणून स्पर्धेत या विषयाचे आयोजन करण्यात आले असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकारे कळविले आहे.