डॉ. अतुलबाबा भोसले यांनी घेतली आमदारकीची शपथ
सातारा
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्राच्या विधानसभेत विशेष अधिवेशनात आमदारकीची शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी ही शपथ दिली.
दीर्घकाळ काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रथमच भाजपाचे कमळ फुलविणारे जायंट किलर म्हणून आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडे संपूर्ण राज्यभरातून पाहिले जात आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विशेष अधिवेशननिमित्त महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहात आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आगमन होताच, भाजपासह महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी आणि सहयोगी आमदारांनी त्यांचे या दैदीप्यमान यशाबद्दल अभिनंदन केले.
आज विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आमदारकीची शपथ घेतली. यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना डॉ. भोसले म्हणाले, की कराड दक्षिण हा संयुक्त महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जपणारा मतदारसंघ आहे. या भागातील जनतेने मला 39 हजारांचे मताधिक्य देऊन, माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझा विजय म्हणजेच एक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडताना प्रामाणिकपणे काम करत, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, तसेच मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या आणि थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते यांच्या विचारांना साजेसे काम मी करणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना, कराडच्या एमआयडीसीचे पंचतारांकित एमआयडीसीमध्ये रुपांतर करणे आणि त्या माध्यमातून नवीन उद्योग व व्यवसाय वाढीसाठीचे प्रयत्न मी करणार आहे. तसेच कराडमधील झोपडपट्टी पुनर्वसन, खराब रस्त्यांचा विषय तसेच आवश्यक ठिकाणी नवीन पुलांची उभारणी करून, कराड हे प्रमुख विकसित शहर म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचा मानस आमदार डॉ. अतुलबाबांनी यावेळी व्यक्त केला.