For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Political News : BJP चा भरोसा युवा नेतृत्वावर, कराडात आगामी निवडणुकीत कुणाचा शब्द चालणार?

04:39 PM May 15, 2025 IST | Snehal Patil
political news   bjp चा भरोसा युवा नेतृत्वावर  कराडात आगामी निवडणुकीत कुणाचा शब्द चालणार
Advertisement

जिल्ह्याचा समतोल राखण्यासाठी पक्षाने कराडमध्ये जिल्हाध्यक्षपद सोपवले

Advertisement

कराड : केंद्रात आणि राज्यात सत्ता असणाऱ्या भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी स्पर्धा होती. परंतु या इच्छुकांमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने कराड दक्षिणचे युवा आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावरच भरोसा असल्याचे दाखवून दिले आहे.

डॉ. अतुलबाबांनी यापूर्वी पक्षाने सोपवलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ. भोसले यांच्याकडेच जबाबदारी सोपवली आहे. सातारा जिल्ह्याला चार मंत्रिपदे, एक राज्यमंत्री पद मिळालेले असताना इच्छुकांची भलीमोठी यादी बाजूला करून जिल्ह्याचा समतोल राखण्यासाठी पक्षाने कराड दक्षिणमध्ये जिल्हाध्यक्षपद सोपवले आहे.

Advertisement

पक्षासाठी प्रामाणिक काम करणारा व तरूण चेहरा या बाबी महत्वपूर्ण ठरल्या असून जिल्ह्यात राजकीय समतोल साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. डॉ. अतुलबाबा सातारा लोकसभेचे प्रभारी असताना राज्यात मविआच्या बाजूने लाट असताना सातारा जिल्हयाने उदयनराजे प्रथमच भाजपला भोसले यांच्या रूपाने खासदार निवडून दिला.

त्याचवेळी लोकसभा प्रभारी म्हणून अतुलबाबांच्या कामगिरीची पक्षाने नोंद घेतली होती. स्वतःच्या दक्षिण कराडमध्ये भाजपला आघाडी मिळवून दिली. या आघाडीनंतर कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पानिपत करून विधानसभेला विजय मिळवला. सन २०१४ ला पश्चिम महाराष्ट्रातील नेतेमंडळींचे भाजपमध्ये इनकमिंग होण्यापूर्वी डॉ. अतुलबाबा भाजपमध्ये दाखल झाले होते. तेव्हापासून ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गुडबुकमध्ये आहेत.

शिवाय जिल्ह्यातील भाजपसह सर्वच महायुतीच्या नेत्यांशी त्यांचे असणारे स्नेहसंबंध आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असण्याने भाजपने या निवडीच्या माध्यमातून पक्षांतर्गत संघर्ष वाढू नये, याचीही काळजी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वच नेत्यांनी अतुलबाबांना विधानसभेला संधी मिळाल्यास त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याचे सांगितले होते.

त्यामुळे पक्षात महत्वाच्या जबाबदाऱ्या डॉ. अतुलबाबांकडे सोपवल्या जात असून आणखी दोन वर्षात मोठ्या संधी त्यांना दिल्या जातील, असे संकेत पक्षाने या निवडीतून दिले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्हा हा भाजपसह महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे.

जिल्हा परिषदेवर एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकावण्याचे आव्हान नूतन जिल्हाध्यक्षांसमोर आहे. याशिवाय नऊ नगरपालिका व नगरपंचायती तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही पक्षाला यश मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

या निवडणुकांच्या निमित्ताने जिल्ह्यातील भाजप नेते व महायुतीच्या नेत्यांमध्ये समन्वय साधण्याचे कसब त्यांना आजमवावे लागणार आहे. २०१६ सालच्या निवडणुकीत कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रस्थापित आघाड्यांना धक्का देऊन भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणणाऱ्या अतुलबाबांच्या दृष्टीने कराड, मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुका महत्वपूर्ण ठरणार आहेत.

Advertisement
Tags :

.