डॉ. अंजलीताईंचे प्रसंगावधान...वाचविले सहप्रवाशाचे प्राण
गोवा-दिल्ली विमानात विदेशी तरुणीवर केले उपचार
प्रतिनिधी/ बेळगाव
गोवा ते दिल्ली विमान प्रवासादरम्यान खानापूरच्या माजी आमदार व एआयसीसीच्या सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी एका विदेशी रुग्णाचा जीव वाचवला. या रुग्णसेवेबद्दल वैमानिक तसेच सहप्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे आभार मानले.
इंडिगो विमानाने डॉ. अंजलीताई या गोव्यावरून दिल्लीला प्रवास करीत होत्या. याच विमानात प्रवास करणाऱ्या एका विदेशी तरुणीला हृदयाचा त्रास जाणवू लागला. ती तरुणी बेशुद्ध झाली. त्यामुळे विमानात एकच धावपळ उडाली. हा प्रकार पाहून डॉ. अंजलीताई यांनी बेशुद्ध तरुणीची तपासणी केली. कार्डिओ पल्मनरी रेस्सुसायटेशन उपचार करून त्या विदेशी तरुणीला शुद्धीवर आणले. अर्धा तासानंतर त्या तरुणीला पुन्हा झटके येऊन ती बेशुद्ध झाली. डॉ. अंजलीताई यांनी आपला वैद्यकीय अनुभव पणाला लावून पुन्हा त्या विदेशी तरुणीला शुद्धीवर आणले. गोवा ते दिल्लीपर्यंतचा अडीच तासांचा प्रवास त्या तरुणीशेजारी उभे राहूनच त्यांनी पूर्ण केला. त्या तरुणीच्या आरोग्याची देखरेख करीत तिची सेवा केली. याची कल्पना वैमानिकाच्या माध्यमातून दिल्ली विमानतळावर देण्यात आली होती. विमानाने दिल्लीत लँडींग केल्यानंतर रुग्णवाहिकेतून त्या तरुणीला इस्पितळात हलवण्यात आले.