अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी डोवाल यांची चर्चा
संरक्षण करारांसंबंधी झाली चर्चा
वृत्तसंस्था/ पॅरिस
मध्यपूर्वेतील तणाव वाढला असताना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे फ्रान्सच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. डोवाल यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. फ्रान्ससोबतचे संरक्षण व्यवहार मार्गी लावण्याच्या दृष्टीने डोवाल यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
दोन्ही देशांनी राफेल मरीन लढाऊ विमाने आणि स्कॉर्पियन पाणबुड्यांच्या व्यवहाराबद्दल चर्चा केली आहे. तसेच भारत-प्रशांत क्षेत्रातील सहकार्य आणि लेबनॉनमधील युद्धसदृश स्थितीवरही चर्चा करण्यात आली आहे.
अजित डोवाल यांनी फ्रेंच संरक्षणमंत्री सेबेस्टियन लेकोर्नु यांची भेट घेत संरक्षण संबंध मजबूत करण्यावर जोर दिला आहे. दोन्ही देश मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उद्योग भागीदारी वाढविण्यावर सहमत झाले आहेत. याचबरोबर नागरी आण्विक संबंधांवरही चर्चा करण्यात आली. राफेल मरीन, स्कॉर्पियन पाणबुडी आणि अंतराळाच्या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यावर आम्ही चर्चा केली. तसेच आंतरराष्ट्रीय स्थिती विशेषकरून युक्रेनवर चर्चा केल्याचे लेकोर्नु यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले आहे.
मध्यपूर्वेसंबंधी चर्चा
डोवाल यांनी अध्यक्ष मॅक्रॉन यांचे राजकीय सल्लागार इमॅन्युएल बोने यांची भेट घेतली. दोघांदरम्यान मध्यपूर्व आणि लेबनॉनच्या स्थितीवर चर्चा झाली आहे. डोवाल यांनी अध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट घेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘क्षितिज 2047 रोडमॅप’ला लागू करण्याच्या प्रतिबद्धतेबद्दल कल्पना दिली आहे.