For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा पंचायत निवडणुकासंबंधी साशंकता

01:06 PM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
जिल्हा पंचायत निवडणुकासंबंधी साशंकता
Advertisement

ठरल्यावेळी होणार की पुढे जाणार : सोमवारपर्यंत होणार अंतिम निर्णय

Advertisement

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुका 13 डिसेंबरला होतील की पुढे ढकलल्या जातील, याबाबत अद्याप साशंकता आहे. निवडणूक आयोग सोमवारपर्यंत अंतिम निर्णय घेऊन जाहीर करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील मतदारयाद्यांची पुनर्रचना सुरू केली असून हे काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालणार आहे.

निवडणुका पुढे ढकलण्याची सूचना

Advertisement

गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी राज्य सरकारला जिल्हा पंचायतीच्या निवडणुका घेतल्यास त्यांच्या कामावर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे याबाबत विचार करावा, असे कळविले आहे. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत जिल्हा पंचायत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही, एवढेच नव्हे तर चर्चाही झाली नाही.

सरकारकडून अद्याप शिफारस नाही

राज्य निवडणूक आयुक्त मिनीनो डिसोझा यांना विचारले असता ते म्हणाले की निवडणुकांची तारीख या अगोदरच जाहीर केलेली असून केवळ अधिसूचना जारी करणे शिल्लक आहे. राज्य सरकारने अद्याप कोणतीही शिफारस केलेली नाही.

सोमवारपर्यंत अधिसूचना काढणार

यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलता येत नाही. मात्र काही विशिष्ट कारण असेल तर तशी परवानगी मागता येते. पण त्याबाबत सरकारने अद्याप आम्हाला कळविलेले नाही. निवडणुका ठरल्याप्रमाणे 13 डिसेंबर रोजी होणार आहेत आणि त्या अनुषंगाने 26 दिवसांची निवडणूक प्रक्रिया असते. त्या दृष्टिकोनातून सोमवारी किंवा मंगळवारी अधिसूचना जारी करावी लागणार आहे.

पर्यायी व्यवस्था कोणती?

जिल्हा पंचायतीच्या या निवडणुका मतपत्रिकेद्वारे होतील. त्यासाठी सरकारी कर्मचारीवर्ग लागणार आहे. सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे गोव्यातील मतदारयादी उजळणीचे काम चालू आहे. त्यासाठी लागणारा कर्मचारीवर्ग आणि आम्हाला लागणारा कर्मचारीवर्ग याबाबत विचार व्हायला हवा. पर्यायी व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी निवडणुकीचे प्रशिक्षण काही अधिकारीवर्गाला द्यावे लागणार आहे.

सरकारकडून अद्याप निर्णय नाही : पांगम

राज्याचे अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी देखील सध्या तरी सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्य निवडणूक आयोगाची जर तयारी असेल आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामावर कोणताही परिणाम होत नसेल तर जिल्हा पंचायतीच्या निवडणुका घेणे सहज शक्य आहे, असे स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.