इम्रानखान जिवीत असण्याविषयी शंका
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी नेते इम्रानखान हे जिवंत आहेत किंवा नाहीत, याविषयी कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांच्या तीन भगिनींनी केला आहे. ते जिवंत असतील तर त्यांची प्रकृती कशी आहे, याविषयीही संशय आहे, असे वक्तव्य त्यांची एक भगिनी नोरीन नियाझी यांनी केले. गेल्या कित्येक आठवड्यांमध्ये इम्रानखान यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू देण्यात आलेले नाही. त्यामुळे आमची चिंता वाढली आहे. त्यांची प्रकृती स्वस्थ राखणे हे पाकिस्तानच्या प्रशासनाचे कर्तव्य आहे. आम्ही अत्यंत चिंताग्रस्त आहोत, अशी प्रतिक्रिया इम्रानखान यांच्या बंधूंनीही पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी एका अफगाणिस्तानच्या वृत्तसंस्थेने इम्रानखान यांची कारागृहात हत्या करण्यात आली आहे, असे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली होती. खान यांना ठेवलेल्या अडियाली कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर, ते जिवंत असून ठणठणीत असल्याचे प्रतिपादन पाकिस्तानच्या प्रशासनाने केले होते. तथापि, आता इम्रानखान यांच्या भगिनींनी पुन्हा शंका उपस्थित केल्याने यासंबंधी संदिग्धता वाढली आहे.