दिवाळीसाठी प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ
बसेस विविध मार्गांवर सुसाट : परिवहनला दिलासा : शक्ती योजनेमुळे सार्वजनिक बससेवेवर परिणाम
बेळगाव : दिवाळी अगदी जवळ आल्याने प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. विशेषत: मूळ गावी परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. परिवहनने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त बसेस उपलब्ध केल्या आहेत. मात्र, शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने सार्वजनिक बस सेवेवर परिणाम होऊ लागला आहे. परिवहनने सामान्य बसेसबरोबर वातानुकूलित बसेच विविध ठिकाणी सुरू केल्या आहेत. बेंगळूर, म्हैसूर, गोवा, पुणे, मुंबई, हैद्राबाद आदी मार्गांवर जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. राज्यांतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू असला तरी आंतरराज्य प्रवासासाठी पैसे मोजावे लागत आहेत. शक्ती योजनेंतर्गत केवळ सीमाहद्दीपर्यंत मोफत प्रवास दिला जात आहे. तेथून पुढे इच्छित स्थळी जाण्यासाठी तिकीट काढावे लागत आहे.
अतिरिक्त महसूल प्राप्त होण्याची अपेक्षा
सण, उत्सवासाठी परिवहनकडून विविध मार्गांवर जादा बस सोडल्या जातात. त्यामुळे अतिरिक्त महसूलही प्राप्त होतो. नवरात्रोत्सव काळात जोतिबा, यल्लम्मा यात्रांतून 84 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. आता दिवाळीसाठी विविध मार्गांवर जादा बस धावू लागल्या आहेत. त्यामुळे दिवाळीतून अतिरिक्त महसूल प्राप्त होईल, अशी अपेक्षा परिवहनला आहे.
प्रवाशांकडून ऑनलाईन बुकिंग सुरू
दिवाळीसाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. रविवारी दिवाळीचा मुख्य दिवस असल्याने आतापासून बुकिंग केले जात आहे. विशेषत: लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ऑनलाईन बुकिंग केले जात आहे. सुखकर प्रवासासाठी वातानुकूलित बस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बेंगळूर, मंगळूर, मुंबई, गोवा, पुणे आदी मार्गांवर वातानुकूलित बसेस सोडल्या जात आहेत. विशेषता रात्रीच बसेस धावत आहेत.
जादा बस 23 नोव्हेंबरपर्यंत
दिवाळीसाठी विविध मार्गांवर जादा बस सोडण्यात आल्या आहेत. 23 नोव्हेंबरपर्यंत जादा बस धावणार आहेत. प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सामान्य बसेसबरोबर वातानुकूलित बसेसही पुरविण्यात आल्या आहेत. विशेषत: लांब पल्ल्याहून प्रवाशांची ये-जा वाढली आहे.
- ए. वाय. शिरगुप्पीकर, डेपो मॅनेजर.