हरिहरनला दुहेरी मुकुट
वृत्तसंस्था / इस्तंबुल
येथे झालेल्या तुर्की आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू अमसाकरुनन हरिहरनने दर्जेदार कामगिरी करत दुहेरी मुकुट संपादन केला. त्याने या स्पर्धेत मिश्र दुहेरी आणि पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकाविले.
मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात हरिहरन आणि त्रीशा जॉली यांनी इंडोनेशियाच्या नेव्हाफ आणि नेहा यांचा 52 मिनिटांच्या कालावधीत 21-14, 18-21, 21-11 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. त्यानंतर झालेल्या पुरूष दुहेरीच्या अंतिम सामन्यात हरिहरन आणि एम. आर. अर्जुन यांनी जपानच्या युटो नोडा आणि ओटा यांचा 21-13, 21-6 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 29 मिनिटांत फडशा पाडत विजेतेपद हस्तगत केले. हरिहरन आणि अर्जुन या जोडीचे या महिन्यातील हे पुरूष दुहेरीतील दुसरे विजेतेपद आहे. याआधी त्यांनी अल अइन मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते.