टीम इंडियाला दुहेरी झटका
दुखापतीमुळे रवींद्र जडेजा, केएल राहुल संघाबाहेर, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमारला स्थान
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
भारत व इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (दि. 2 फेब्रुवारी) विशाखापट्टणममध्ये सुरु होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाला दुहेरी झटका बसला आहे. दुखापतीमुळे अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. आता, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक या दोन्ही खेळाडूंवर लक्ष ठेवून आहे. निवड समितीने दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश केला आहे.
हैदराबाद येथील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळताना जडेजाच्या हाताला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे, केएल राहुलच्या शरीराची उजवी बाजू दुखत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तोही या सामन्यात खेळणार नाही. दरम्यान, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक या दोघांच्या दुखापतींवर लक्ष ठेवून आहे. दुखापतीमुळे या दोघांनाही विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे विशाखापट्टणम कसोटीत हे दोघे सहभागी होणार नाहीत. विशेष म्हणजे पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहली आधीच संघाबाहेर आहे. तीन महत्वपूर्ण खेळाडू संघाबाहेर असल्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी ही मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे.
सरफराज, वॉशिंग्टन सुंदर व सौरभ कुमारला संधी
बीसीसीआयने या दोघांची जागा भरून काढण्यासाठी तीन खेळाडूंना संघात घेतले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील काही वर्षांपासून धावांचा पाऊस पाडणारा मुंबईचा सरफराज खान अखेर टीम इंडियात सामील झाला आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी मिळू शकते. याशिवाय, वॉशिंगटन सुंदर आणि सौरभ कुमार या दोघांनाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सरफराजने डिसेंबर 2014 मध्ये पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. यानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले. सरफराजची गेल्या काही वर्षांतील कामगिरी पाहता त्याच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होते. आता राहुलच्या दुखापतीमुळे सरफराजचे नशीब चमकले आहे.
याशिवाय, उत्तर प्रदेशचा 30 वर्षीय युवा फिरकीपटू सौरभ कुमारलाही मोठी लॉटरी लागली आहे. अलीकडेच इंग्लंड लायन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सौरभने शानदार कामगिरी साकारली होती. सौरभ हा रवींद्र जडेजासारखाच डावखुरा खेळाडू आहे. त्यामुळे जडेजाच्या जागी सौरभ हा एकदम फिट बसू शकतो, असे सध्या दिसत आहे. यामुळे अंतिम 11 मध्ये त्याला स्थान मिळते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वॉशिंगटन सुंदरही भारतीय संघात कमबॅक करणार आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुंदरने अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन केले होते.
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश. कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.
आयसीसीची बुमराहला ताकीद
हैदराबाद कसोटीत झालेला पराभव टीम इंडियाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवातून भारतीय संघ सावरत असतानाच अजून एक धक्का संघाला बसला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या सामन्यात सहा विकेट्स घेतल्या आणि महत्वाची जबाबदारी पार पाडली. असे असले तरी, सोमवारी (29 जानेवारी) आयसीसीने बुमराहवर मोठी कारवाई केली गेली. बुमराहने आयसीसी आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. यासाठी त्याला आयसीसीकडून एक डींमेरिट पॉईंट देखील दिला गेला. आंतरराष्ट्रीय खेळाडू, सपोर्ट स्टाफ, पंच, मॅच रेफरी यांच्याशी एखादा खेळाडू गैरवर्तन करत असेल, तर आयसीसीकडून त्याच्यावर कारवाई केली जाते. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 81 व्या षटकात बुमराह आणि ऑली पोप यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता. पोप आणि बुमराह खेळपट्टीवर एकमेकांना धडकल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. पंचांनी हे लक्षात घेऊन भारतीय गोलंदाजाला एक डीमेरिट पॉईंट दिला आहे.