कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय हॉकी संघाचा डबल धमाका

06:48 AM Sep 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हरमनप्रीतचे 2 तर मनप्रीतचा 1 गोल : अन्य एका लढतीत चीनने उडवला कझाकस्तानचा 13-1 ने धुव्वा

Advertisement

वृत्तसंस्था/ राजगीर (बिहार)

Advertisement

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेत आपली विजयी धडाका कायम ठेवताना सलग दुसरा विजय मिळवला. रविवारी झालेल्या लढतीत भारताने जपानला 3-2 असे पराभूत केले. या विजयासह टीम इंडिया पूल अ पॉइंट्स टेबलमध्ये 6 गुणासह अव्वलस्थानावर आहे. आता, भारतीय संघाचा गटातील शेवटचा सामना दि. 1 रोजी कझाकिस्तानविरुद्ध होणार आहे. विशेष म्हणजे, हरमनप्रीत सिंगने पहिल्या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही दोन गोल करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

राजगीर येथील बिहार स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी हॉकी स्टेडियमवर सुरु असलेल्या स्पर्धेत भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. सामन्यातील चौथ्या मिनिटाला मनदीप सिंगने मैदानी गोल केला. यामुळे भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी मिळाली. यानंतर लगेचच पाचव्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करून भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मध्यंतरापर्यंत कायम होती. पहिल्या दोन सत्रात जपानला 13 व 24 व्या मिनिटाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण त्यांना गोल करण्यात मात्र अपयश आले.

हरमनप्रीतचा चमत्कार

पहिल्या दोन सत्रातील खराब कामगिरीनंतर जपानने तिसऱ्या सत्रात पुनरागमन केले. जपानच्या कवाबे कोसेईच्या गोलने पुनरागमन केले. कोसेईने 38 व्या मिनिटाला बॅक हँड शॉट मारला आणि चेंडू गोलपोस्टच्या आत ढकलला. यानंतर चौथ्या सत्रात भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. हा हरमनप्रीतचा दुसरा आणि भारतीय संघाचा तिसरा गोल होता. यामुळे भारतीय संघाला 3-1 अशी आघाडी मिळाली. यानंतर जपानने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. शेवटच्या शिट्टीच्या अगदी आधी, जपानच्या कवाबे कोसेईने (58 व्या मिनिटाला) त्याचा आणि संघाचा दुसरा गोल केला. तथापि, तो त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शेवटच्या सत्रात जपानने बरोबरी साधण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण भारतीय संघाचा गोलरक्षक सुरजच्या बचावासमोर त्यांना यश आले नाही. अखेरीस भारतीय संघाने हा सामना 3-2 असा जिंकत सलग दुसरा विजय मिळवला.

चीनकडून कझाकिस्तानचा 13-1 ने धुव्वा

आशिया चषक हॉकी स्पर्धेतील अन्य एका लढतीत चीनने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी कझाकिस्तानला 13-1 अशा फरकाने पराभूत केले. या विजयासह त्यांना 3 गुण मिळाले असून अ गटात ते आता दुसऱ्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे, चीनने मिळवलेला हा विजय हा आशिया चषकातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. चीनच्या विजयात युआनलिन लूने हॅट्ट्रिक नोंदवत विजयात मोलाचे योगदान दिले. कझाकिस्तानला मात्र या स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता, चीनची पुढील लढत जपानविरुद्ध होईल. या सामन्यात विजय मिळवत त्यांचा उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याचा मानस असेल.

भारत-कझाकिस्तान आज आमनेसामने

आशिया चषक हॉकी स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा अ गटातील शेवटचा साखळी सामना कझाकिस्तानशी होईल. पहिल्या सामन्यात चीन तर दुसऱ्या सामन्यात जपानला पराभूत करत सलग दोन विजय मिळवले आहेत. आता, आज कझाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत गटात अव्वल राहण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. विशेष म्हणजे, आशिया चषक स्पर्धेतील विजेता पुढील वर्षी बेल्जियममध्ये होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहे. पर्यायाने, भारतीय हॉकी संघ या स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल, हे निश्चित.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article