For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

डबल धमाल !

06:30 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
डबल धमाल

देशातील बाजारपेठेत नि पर्यायानं अर्थव्यवस्थेत नवनवीन विक्रम पाहायला मिळाले ते ग्राहकांच्या उत्साहाला सणांच्या मोसमावेळी पारावार न राहिल्यानं...त्यात भर पडली ती भारतात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेटच्या महाकुंभाची, विश्वचषक स्पर्धेची...ही ‘डबल धमाल’ व्यापाऱ्यांना, कंपन्यांना मालामाल करून गेलीय...

Advertisement

उत्सवांचा मोसम नुकताच संपलाय...‘धनतेरस’, दिवाळी आणि भाऊबीज यांच्या समाप्तीनंतर लगेच ते उत्साही वातावरण धुक्यात हरवण्यास प्रारंभ होतोय...विविध कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ओणम’पासून सुरू झालेला यंदाचा उत्सवांच्या जल्लोषानं गेल्या वर्षाहून चांगल्या आकड्यांची नोंद केलीय...ग्राहकांनी फारसा विचार न करता आपला खिसा सोन्याचे दागिने, फर्निचर, मोबाईल्स, एअर-कंडिशनर्स, लॅपटॉप्स, कार्स, कपडे अन् महागड्या खाद्यपदार्थांसाठी सुद्धा रिकामा केलाय...त्यात भर पडलीय ती मर्यादित षटकांच्या विश्वचषक स्पर्धेची...यात अगदी सुसाट वेगानं पळाले ते ‘स्मार्टफोन्स’. खरं म्हणजे क्रिकेटवेड्या ग्राहकांनी त्यालाच जेता बनविलंय. विश्लेषकांच्या मतानुसार, गेल्या वर्षाच्या याच कालावधीशी तुलना केल्यास महागड्या मोबाईल्सनी 50 ते 55 टक्क्यांची वृद्धी नोंदविलीय. याचाच अर्थ सध्या नि भविष्यात सुद्धा मनोरंजन हा महत्त्वाचा ‘ट्रेंड’ बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय...

‘विजय सेल्स’चे संचालक नीलेश गुप्ता यांच्यानुसार, लोक मोबाईल्सवर जास्तीत जास्त पैसे खर्च करताहेत. त्या उपकरणाच्या रकमेशी तडजोड करण्याची कुणाचीही तयारी नाहीये. लोक जेव्हा प्रवास करतात तेव्हा सुद्धा विविध प्रकारचे विषय त्यांना मोबाईल्सवर पाहणं शक्य होतं. मोबाईल्सशिवाय लॅपटॉप्स, स्मार्ट-वॉचिस, लहान उपकरणं यांनीही नवरात्री ते दिवाळीपर्यंत बऱ्यापैकी विक्रीची नोंद केलीय...‘महागड्या वस्तूंची खरेदी’ या तीन शब्दांनी अक्षरश: प्रत्येक ग्राहकावर मोहिनी घातलीय असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. अनेक व्यक्तींनी ‘अपग्रेडिंग’ करण्यासाठी नवीन वस्तू खिशात घातल्या. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा ‘ट्रेंड’ महागाईनं उच्चांक गाठून देखील चाललाय. त्यामागचं एक मोठं कारण म्हणजे ग्राहकांना मिळणाऱ्या विविध वित्तीय संस्थांच्या योजना...

Advertisement

टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन्स, एसी’ला मागणी...

Advertisement

‘गोदरेज अप्लायन्सेस’नुसार, ‘फ्रॉस्ट फ्री’ रेफ्रिजरेटर्सनी खूप चांगला व्यवसाय केलाय. परंतु ‘सिंगल डोअर्स’ मात्र शर्यतीत मागे पडले. ‘वॉशिंग मशिन्स’च्या बाबतीतही ‘टॉप-लोड्स’नी चांगली कामगिरी नोंदविलीय. विश्वचषक स्पर्धेमुळं चंगळ झाली ती महागड्या, मोठ्या आकाराच्या दूरचित्रवाणी संचांची. ‘हॅवेल्स इंडिया’नुसार, त्यांच्या स्मार्ट व ‘क्यूएलईडी टीव्ही’ना फार मोठा प्रतिसाद मिळालाय. पण ‘विजय सेल्स’नुसार, अपेक्षेइतकी विक्री झालेली नाहीये...उत्तर भारतात यंदा उकाडा कमी प्रमाणात जाणवल्यानं ‘एसी’चा खप मंदावलेला असला, तरी ‘ओणम’ ते ‘दिवाळी’पर्यंतच्या कालावधीनं सारी कसर भरून काढलीय. ‘ब्ल्यू स्टार’नं गेल्या वर्षाशी तुलना केल्यास 30 टक्क्यांची वाढ नोंदविलीय, तर सर्वाधिक खपणाऱ्या ‘टाटा समूहा’च्या ‘व्होल्टास’नं ग्राहकांना अक्षरश: खेचलं. तथापि समूहाच्या मते, ही सारी करामत ‘रिअल इस्टेट’च्या विस्ताराची...

‘कन्झ्युमर ड्युरेबल्स’ उद्योगासह कार्स, दागिन्यांची बाजी...

तीन ते पाच वर्षांपूर्वी कमी किमतीच्या वस्तू खरेदी करणाऱ्या व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळत नसे. परंतु सध्या ती परिस्थिती बदलल्यामुळं सर्वांनीच हात व्यवस्थितरीत्या धुवून घेतलेत. ‘कन्झ्युमर ड्युरेबल्स इंडस्ट्री’चा विचार केल्यास नवरात्री ते दिवाळीदरम्यान दर्शन घडलं ते 20 टक्के वृद्धीचं...प्रवासी कार्सनी ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स’च्या जोरावर जबरदस्त बाजी मारली आणि एका अंदाजानुसार, ‘ओणम’ ते ‘भाऊबीज’ दरम्यान 1.3 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळविला...ग्राहकांनी उड्या मारल्या त्या सोन्याच्या दागिन्यांवर सुद्धा. सर्वांत जास्त लोकप्रियता मिळविली ती ‘ब्रेसलेट्स’ व लहान साखळ्या यांनी. गेल्या वर्षाशी तुलना केल्यास ‘धनतेरस’ ते ‘दिवाळी’ या कालावधीतच ‘जॉयलुकास ग्रुप’नं 28 टक्के अधिक विक्री केलीय...

‘ऑनलाइन’लाही जबर प्रतिसाद...

सध्या ऑनलाइनचा जमाना असल्यानं ग्राहकांना कुठल्याही एका ‘ब्रँड’वर अवलंबून राहण्याची गरज नाहीये. ‘अॅमेझॉन’नं दिलेल्या माहितीनुसार, लोकांवर प्रभाव घातलाय तो ‘फॅशन सेगमेंट’नं. कपड्यांशिवाय महागडे बूट, महागडी सौंदर्यप्रसाधनं यांनीही वरचं स्थान मिळविलंय. विशेष म्हणजे 60 टक्के खरेदी करणाऱ्या व्यक्ती या दुसऱ्या क्रमांकाच्या शहरांतील होत्या...पॅकबंद वस्तूंचा विचार केल्यास बाजी मारलीय ती ‘आयटीसी’नं, तर ’फर्निचर’च्या विश्वात ‘पेपरफ्लाय’नं. विशेष म्हणजे सर्व वस्तूंच्या गटात वृद्धीचं दर्शन घडलंय...

विश्वचषकामुळं दुसरी दिवाळी...

विविध ‘ब्रँड्स’ना दुसरी ‘दिवाळी’ साजरी करणं शक्य झालं ते ‘आयसीसी’च्या ‘वर्ल्डकप’मुळं. ऑक्टोबर ते मार्चदरम्यानच्या कालावधीत विक्रीचा जो अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्याहून 20 ते 25 टक्के अधिक खप पाहायला मिळाला. ‘ब्रँड्स’नी विराट कोहली, मोहम्मद शमी, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांचा जणू पाठलागच केला...क्रिकेटनं भारतीयांच्या जीवनात एक खास स्थान मिळविलंय नि त्याचं दर्शन पुन्हा एकदा घडलं. काही अतिशय यशस्वी ‘ब्रँड्स’ तर फक्त क्रिकेटचा वापर मार्केटिंग व जाहिरातींसाठी करतात. कंपन्यांचा उत्साह जरा जास्तच वाढला तो भारतानं साखळी फेरीतील सर्व सामने जिंकल्यानं...

‘मारुती सुझुकी’कडून ‘क्रिकेट फिव्हर’वर प्रचंड खर्च...

‘मारुती सुझुकी’नं विश्वचषक स्पर्धेसाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च केलेत. त्यापैकी 35 कोटी दूरचित्रवाणीसाठी, तर 15 कोटी ‘ओटीटी’करिता. आस्थापनानं भारताच्या सहा आणि अन्य महत्त्वाच्या नऊ सामन्यांवर लक्ष केंद्रीत केलं होतं...आपल्या देशानं अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर ‘मारुती’नं ‘ओटीटी’वरील खर्च दुपटीनं वाढविला. ‘डिस्ने स्टार’नं विक्री न झालेल्या वेळेसाठी (टीव्ही व डिजिटल) अंतिम सामन्यापूर्वी 100 ते 150 टक्के दर वाढविले. विशेष म्हणजे काही प्रादेशिक ‘ब्रँड्स’नी सुद्धा या नदीत उड्या मारल्या...

क्रिकेटकडे वळली अनेक नवीन नावं...

एप्रिल ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत बिनभरवशाच्या वातावरणामुळं सारा खेळच बिघडला होता. पण विश्वचषक स्पर्धेनं त्याची भरपाई केली. ‘हॉटस्टार’नं ‘वर्ल्ड कप’ सामन्यांचं स्ट्रिमिंग पहिल्यांदाच केल्यामुळं प्रादेशिक ब्रँड्सना किमतीला तोंड देणं शक्य झालं, क्रिकेटच्या महाकुंभात पोहणं जमलं...टीव्हीशिवाय मोबाईल प्लॅटफॉर्म्सना देखील लहान कंपन्यांनी लक्ष्य केलं. उदाहरणार्थ ‘स्विगी इन्स्टामार्ट’नं केलेला बुमराहचा वापर...यंदा प्रथमच क्रिकेटला कधीच स्थान न देणाऱ्या ‘हिंदुस्तान लिव्हर’सारख्या ‘एमएफसीजी ब्रँड’नं देखील विश्वचषकाच्या गंगेत हात धुवून घेण्याचा लाभ घेतला...

या क्षेत्रातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सहप्रायोजक कंपन्यांनी दूरचित्रवाणीवरील जाहिरातींसाठी 90 ते 100 कोटी रुपये, तर ‘असोसिएट स्पॉन्सर्स’नी 65 ते 70 कोटी रुपये ओतलेत...‘डिजिटल’ म्हणजेच ‘डिस्ने हॉटस्टार’चा विचार केल्यास सहप्रायोजक आस्थापनांनी 55 ते 65 कोटी रुपये, तर ‘असोसिएट स्पॉन्सर्स’नी 25 ते 30 कोटी रुपये खर्च केले. ‘सुजाता अप्लायन्सेस’सारख्या अनेक नवीन ‘ब्रँड्स’नी यंदा प्रथमच क्रिकेटच्या विश्वाचं तोंड पाहण्यासाठी अंतिम सामन्याच्या वेळी 2 कोटी रुपये खर्च करण्यापर्यंत मजल मारली. तथापि, बड्या ‘कन्झ्युमर ड्युरेबल्स’ कंपन्यांनी मात्र या स्पर्धेकडे फारसं लक्ष दिलं नाही...

प्रसारणातून विक्रमी महसूल...

क्रिकेट विश्वचषकाच्या प्रसारणातून मिळालेल्या जाहिरातींच्या कमाईनं यंदा अपेक्षेपेक्षा जास्त उ•ाण करून दाखविलंय अन् याचं सारं श्रेय जातं ते संपूर्ण स्पर्धेत भारतानं केलेल्या दमदार कामगिरीला. त्याच्या जोरावर ‘डिस्ने स्टार’चा जाहिरात महसूल 25 टक्के वाढीचा सुरुवातीचा अंदाज चुकवत चक्क 3 हजार कोटी ऊपयांपर्यंत पोहोचला...‘डिजिटल’वर ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यातील अंतिम फेरीचं सर्वाधिक दर्शन घेतलं गेलं ते 5 कोटी 90 लाख दर्शकांनी. ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवरील दर्शकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळं 2019 च्या तुलनेत जाहिरातींतून उत्पन्नाचा ओघ वाढला. त्याला जोड मिळाली ती सणांच्या हंगामाची...

एका अंदाजानुसार, भारताच्या 11 सामन्यांना सरासरी 2 कोटी 90 लाख दर्शक मिळाले. ते ‘डिजिटल’वरील इतर कोणत्याही स्पर्धेपेक्षा जास्त अन् भारताचा समावेश नसलेल्या सामन्यांच्या तुलनेत पाच पट जास्त राहिले (अशा 33 बिगरभारतीय लढतींना लाभले सरासरी 55 लाख दर्शक)...भारताच्या सामन्यांनी 400 ते 450 ऊपये इतका सर्वाधिक ‘सीपीएम’ (कॉस्ट पर माईल) खेचून दाखविला. तो ‘इंडियन प्रीमियर लीग’पेक्षाही 20 ते 25 टक्के अधिक. याचं कारण भारतीय संघाच्या उत्कृष्ट कामगिरीबरोबर ‘ओटीटी’ प्लॅटफार्म्सवर क्रिकेट रसिकांना विनामूल्य सामने पाहण्याची जी संधी दिली गेली त्यातही दडलंय असं या क्षेत्रातील तज्ञांना वाटतंय...

व्यापारी संघटनेनुसार यंदाची दिवाळी उच्चांकाची...

? फक्त दिवाळीच्या दिवसांत (यात भाऊबीज, बलिप्रतिपदा यांचा समावेश नाही) किरकोळ तसेच ऑनलाइन स्टोअर्सवरील विक्री सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’नं (सीएआयटी) जाहीर केल्यानुसार, या कालावधीत भारतातील किरकोळ बाजारांनी नोंदवला तो 3.75 लाख कोटी रुपयांचा विक्रमी व्यापार. हंगाम संपेपर्यंत त्यात आणखी 50 हजार कोटी ऊपयांची भर पडलेली दिसेल असा अंदाज त्यांनी वर्तविलाय...

? दिवाळीच्या दिवसांत खाद्यपदार्थ आणि किराणामालावर 13 टक्के, कापड आणि कपड्यांवर 12 टक्के, दागिन्यांवर 9 टक्के, इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईलवर 8 टक्के, भेटवस्तूंवर 8 टक्के, सौंदर्यप्रसाधनांवर 6 टक्के, सुका मेवा, मिठाई नि नमकीनवर 4 टक्के, फर्निचरवर 4 टक्के, गृहसजावटीवर 3 टक्के, पूजेच्या सामग्रीवर 3 टक्के, भांडी तसेच स्वयंपाकघरातील उपकरणांवर 3 टक्के, कन्फेक्शनरी आणि बेकरीवर 2 टक्के खर्च करण्यात आला. तर उर्वरित 20 टक्के खर्च वाहनं, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल साहित्य, खेळणी अन् इतर विविध वस्तू नि सेवांवर झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय..याशिवाय संपूर्ण भारतात 5 हजार कोटी रुपये किमतीची फुले आणि 2 हजार कोटी रुपये किमतीची फळांची सुद्धा विक्री झाली...

? ‘सीएआयटी’च्या आकडेवारीनुसार, देशातील किरकोळ बाजारांनी गेल्या वर्षीच्या दिवाळी हंगामात नोंदविली होती ती 2.75 लाख कोटी रुपयांची विक्री...व्यापारी संघटनेच्या दाव्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ आवाहनामुळं भारतात बनवलेल्या वस्तूंना प्राधान्य दिलं गेलं आणि चिनी वस्तूंच्या विक्रीत घट झाली ती तब्बल 1 लाख कोटी ऊपयांची...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
×

.