महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दार.... महाद्वार....2

06:04 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एखाद्या घरात लग्न समारंभ झाला की त्या घरात येणारी सून पुढच्या कार्यक्रमासाठी तयार असते. तो म्हणजे उंबरठा ओलांडण्याचा कार्यक्रम. आजकाल या सगळ्याचे इव्हेंट होत चालल्यामुळे तो किती देखणा असतो हे आपण बघतोच. येणाऱ्या सुनेसाठी पायघड्या, उंबरठ्यात ठेवलेले सोनेरी माप, त्यातलं धान्य ओलांडून पुढे आलेली सून, वधू खरं म्हणजे दार ओलांडत असते, उंबरठा ओलांडत असते, म्हणजेच या सगळ्या नव्या संस्कारांना रिती भातींना ती स्वीकारत असते. पण त्याच वेळेला ती आधीचं घर सोडून म्हणजे तिथली चौकट सोडून तिथला उंबरठा सोडून ती आपल्याकडे आलेली असते. तिकडचा उंबरठा सुना झालेला असतो. तर इकडचा सजलेला असतो. अशा या दोन्ही प्रक्रिया आपण एकाच कार्यामध्ये बघतो. प्रत्येक गावाला आज अशी वेस असते. एक दरवाजा असतो आणि एक उंबरठा देखील असतोच. काहींच्या वेशीच्या जवळ मारुतीचं मंदिर, वडाचे झाड, पिंपळाचं झाड या गोष्टी खुणेसाठी असतातच पण काही ठिकाणी मात्र अगदी आखीव रेखीव बांधलेली वेस देखील पाहायला मिळते. या वेशीतून रोजंदारीसाठी बाहेर जाणारी माणसं या वेशीला मनोमन सांगत असतात माझं घरदार, शेतीवाडी सांभाळून ठेव गं बाई. कारण महिनाभर, अनेक वर्षे घराबाहेर राहणारे, सरकारी लोक, बँकेचे लोक, अधिकारी, ऊस तोडणीचे कामगार, बांधकाम मजूर किंवा शेतातले मजूर हे घरापासून दूर असतात. अशावेळी ही वेसच या दारांचे रक्षण करत असते. असे दरवाजे आमच्या राज्याला, राष्ट्राला आणि देशालासुद्धा असतात. आम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना अनेकदा आमची गाडी थांबवली जाते आणि पुढच्या राज्यात जाण्यासाठीची परवानगी घेतली जाते. खरंतर आम्ही एकाच राष्ट्राचे असलो तरी प्रत्येक राज्याच्या सीमा किंवा दरवाजे ठरलेले असतात. हा उपचार जरी झाला तरी हे आहे हे मान्य असतं.

Advertisement

आमच्या देशाला देखील अशा सीमा असतात. आमच्या भारताचा दरवाजा त्याला आम्ही दिल्ली म्हणतो. दिल्ली हा शब्द ‘देहलीज’ या शब्दावरून ठरला. देहेलीच म्हणजे उंबरठा. भारतात येण्यासाठी भारताचा उंबरठा ओलांडायला आधी दिल्ली शहरात यायला लागतं. खूप प्राचीन काळी भारतावरती जे काही परकीय हल्ले झाले ते या दिल्ली शहराच्या आधी असलेल्या हिमाचलाच्या बाजूला खैबर खिंडीतूनच झाले. ही झाली एक बाजू तर दुसरी बाजू म्हणजे आमच्या मुंबई शहरात असलेले गेटवे ऑफ इंडिया जिथे भारताचा समुद्रातला दरवाजा उघडतो ती जागा. या मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियातून समुद्र मार्गे भारतात अनेक परकीय हल्ले झाले. आम्ही मात्र कधीही आमचा हा समुद्र ओलांडला नाही किंवा कोणत्या खिंडीही पार केल्या नाहीत कारण मुळातच आम्हा भारतीयांना निसर्गाने दिलेली वरदानं इतकी भरभरून लाभली होती की इतर देशांना आमच्यावर आक्रमण करावसं वाटलं आणि आमच्या दरवाज्यात यावंसं वाटलं. आमच्या धर्मातच समुद्र ओलांडायचा नाही असा काहीतरी एक अंधश्रद्धेचा भाग वर्षानुवर्ष लोक जपत आले. त्यामुळे आम्ही कधीही दुसऱ्या देशांवर हल्ला केला नाही. आमचं साम्राज्य मुळातच इतकं मोठं होतं की आम्हाला दुसऱ्यांवर हल्ले करून काही लुटून आणायची कधी वेळच आली नाही पण इतर राष्ट्रांनी मात्र आमचे उंबरठे ओलांडले आणि आमच्याच दरवाजातून आमच्यावर पहारे बसवले व स्वत:चे देश श्रीमंत करत गेले. आमच्या भारतीयांनी परकीय पाहुण्यांना सुद्धा पायघड्या घातल्या त्यांना आमच्या निसर्गातले उत्पादन भरभरून दिले परंतु हे अतिशय क्रूर राक्षस असल्यामुळे त्यांनी इथलं सगळं ओरबाडून न्यायचं ठरवल्यामुळे आमची धनसंपत्ती घेतांना आमचा समाज, आमचा निसर्ग सगळं काही विभागले गेले. आणि स्वत: मोठे होत असतांनाच दुसऱ्याच्या देशाला अंधाराच्या खाईत लोटलं याचा कधी पश्चताप झाला नाही. तरी यांचा सूर्य कधी मावळतच नाही असं अभिमानाने  सगळ्या जगाला सांगत बसले. पण निसर्ग नियम त्यांच्या लक्षातच आला नाही जो उगवतो तो मावळतोच. असे मावळणारे सूर्य आता त्यांनाही दिसायला लागलेत. जे निर्माण होते ते नष्ट होतंच या तत्त्वज्ञानात वाढलेले आमचे स्नेहाचे बुलंद दरवाजे कायमच अबाधित राहिले आहेत. सत्ता येते आणि जाते, राष्ट्र जागेवरच असते. त्यानुसार आमच्या देशाशी दारं, तटबंदी या राष्ट्र प्रेमावर कायम उभी राहणार आहे. आमच्या देशाच्या सीमा म्हणजे खरं म्हणजे आमचे अभेद्य दरवाजे. याचं संरक्षण 24 तास डोळ्यात तेल घालून करणारे आमचे सशस्त्र सैन्य कायमच वंदनीय आहेत. आमच्या देशाच्या या सीमा सुरक्षित ठेवून आमचे सगळ्यांचे दरवाजे, त्या दरवाज्यातले उंबरठे त्याच्या पुढच्या रांगोळ्या आणि दाराची तोरणं कायम अबाधित ठेवणारे हे दरवाजे कायम स्मरणात ठेवायलाच हवे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article