‘टी-20’मध्ये खेळण्याच्या ताणाचा बाऊ नको
‘मुंबई इंडियन्स’चे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांचे मत : क्रिकेटच्या इतर दोन प्रकारांत शरीरावर अधिक ताण
वृत्तसंस्था / मुंबई
खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्याविषयी सतत होणाऱ्या चर्चेत ‘टी-20’च्या बाबतीत बाऊ केला जात आहे. कारण क्रिकेटच्या इतर दोन प्रकारांत शरीरावर अधिक ताण पडत असतो, असे मत मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी व्यक्त केले आहे. 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या ‘आयपीएल’च्या आधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाउचर यांनी ‘टी-20’मध्ये खेळण्याच्या ताणाचे व्यवस्थापन करण्याची गरज आपल्याला वाटत नसल्याचे सांगितले.
तथापि, या वर्षाच्या अखेरीस मायदेशात होणारी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन आयपीएलच्या कालावधीत भारतीय खेळाडूंवर पडणाऱ्या भारावर बीसीसीआयकडून बारकाईने लक्ष निश्चित ठेवले जाईल. ‘हे आश्चर्यकारक आहे की, आम्ही टी-20 क्रिकेटमध्ये खेळण्याच्या ताणाबद्दल बोलत आहोत. कदाचित 10 किंवा 15 वर्षांपूर्वी आम्ही यावर भाष्य केले नसते. खेळण्याच्या ताणाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्यामागे शास्त्र आहे, आमच्याकडे प्रशिक्षक आहेत आणि माहिती देणारे लोक आहेत, याकडे बाउचर यांनी बुधवारी लक्ष वेधले.
खेळण्याच्या ताणाबद्दल बरीच चर्चा होते. पण तुम्ही आमचे वेळापत्रक पाहिल्यास आम्हाला सामन्यांच्या दरम्यान बऱ्यापैकी विश्रांती मिळेल. आम्ही प्रयत्न करू शकतो आणि प्रत्येक खेळाडूची काळजी घेऊ शकतो. संपूर्ण आयपीएलमध्ये आमच्यासाठी खेळण्याचा ताण ही प्रमुख समस्या राहील, असे मला वाटत नाही. कधी कधी मीडिया आणि लोक ‘टी-20’ क्रिकेटमधील खेळण्याच्या ताणावर जास्तच भर देतात, असे बाउचर पुढे म्हणाले. कसोटी क्रिकेट व एकदिवसीय क्रिकेट शरीरावर जास्त ताण टाकणारे आहे. ‘टी-20’ क्रिकेटची व्याप्ती कमी आहे. तेव्हा आम्ही ‘टी-20’ क्रिकेटमध्ये खेळण्याचा ताण पडत असल्याचे म्हणू नये, असे दक्षिण आफ्रिकेचा हा माजी यष्टीरक्षक-फलंदाज म्हणाला.
सूर्याला सूर गवसण्याची आशा
ऑस्ट्रेलियाविऊद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादवने अत्यंत खराब कामगिरी केल्यानंतर आता आयपीएलमध्ये तो पुनरागमन करण्याची आशा बाउचर यांना वाटत आहे. सूर्यकुमार ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या तिन्ही लढतींत पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. ‘सूर्या ठीक आहे. फलंदाज पहिला चेंडू कसा खेळतो यावरून तुम्ही त्याचा फॉर्म ठरवू शकत नाही. मी त्याला कसे वाटते असे विचारले असता त्याने आपण खूप चांगल्या पद्धतीने चेंडू फटकावत असल्याचे सांगितले’, असे त्याने सांगितले.
एखादा खेळाडू पहिला चेंडू पार करू शकला नाही याचा अर्थ तो फॉर्ममध्ये नाही, असे तुम्ही म्हणू शकत नाही. दुर्दैवाने गेल्या तीन सामन्यांत तो पहिला चेंडू पार करू शकला नाही. आशा आहे की, जेव्हा तो आयपीएलमध्ये पहिल्या चेंडूला सामोरे जाईल तेव्हा संपूर्ण स्टेडियममधील प्रेक्षक जल्लोष करतील आणि तो परत एकदा सुरात येईल. तो एक महान खेळाडू आहे आणि या क्षणी बहुदा जगातील सर्वोत्तम टी-20 खेळाडू आहे, असे उद्गार बाउचर यांनी काढले. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे इतर गोलंदाजांना पुढे जाण्याची संधी मिळेल. आमचा मारा खूपच चांगला आहे. पण बुमराहला मुकणे हे आमच्यासाठी निश्चितच मोठे नुकसान आहे’, असेही त्यांनी सांगितले.