कारणे नकोत, कृती करा... रंगभूमी जगवा!
मनीषा सुभेदार/बेळगाव
मराठी माणूस नाटकांचा भुकेला आहे, हे वाक्य आता वापरून वापरून अक्षरश: गुळगुळीत झाले आहे. जर हा माणूस नाटकांचा भुकेला आहे तर नाटक किंवा रंगभूमी जगविण्याची जबाबदारीसुद्धा त्याचीच आहे. नाट्यागृह खूप लांब आहे, देणगी प्रवेशिका परवडत नाहीत किंवा आशयगर्भ, अर्थपूर्ण असे काही मिळत नाही यासारखी तकलादू कारणे देणे त्याने बंद करायला हवे. आपण जर खरोखरच नाटकाचे रसिक असू तर नाटक किंवा रंगभूमी जिवंत ठेवण्यासाठी कोणत्याही सबबी न देता नाटकाला जाणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. एक काळ असा होता की, मराठी रंगभूमीवरील प्रभाकर पणशीकर, दाजी भाटवडेकर, अशोक सराफ यांच्यासारखे दिग्गज कलाकार बेळगावमध्ये नाटकाचा प्रयोग होण्यासाठी उत्सुक असत. बेळगावला नाटक करायला हवे, असे जुन्या पिढीतील प्रत्येक कलाकाराला वाटत होते, अशी आठवण नुकतेच बेळगावला आलेले दिग्दर्शक विजय केंकरे यांनी गप्पांच्या ओघात सांगितली. मात्र, बेळगावकर नाटकापासून बरीच वर्षे वंचितच राहिले.
सीमा प्रदेशामुळे नाटकाची बस परराज्यात प्रवेश करावयाची असल्यास भरमसाट कर भरावा लागतो. हा कर अव्वाच्या सव्वा लावल्यामुळे बेळगावला नाटक येणे बंद झाले आणि वर्षानुवर्षे बेळगावचे रसिक नाटकापासून वंचित राहिले. बेळगावचे प्रेक्षक खरे रसिक आहेत, अशा शब्दात प्रभाकर पणशीकर यांनी बेळगावकरांचे कौतुक केले होते. मात्र, तेच रसिक नाटकापासून दुरावले. ज्या काही संस्थांनी येथे नाटकांचे प्रयोग केले, त्या संस्था व त्यातील कलाकारांनी त्यावेळी आपण महाराष्ट्रात जाऊन याबाबत सरकारशी, सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा करू, असे प्रत्येकानेच सांगितले. प्रत्यक्षात ही चर्चा केली का? त्यातून काही निष्पन्न झाले का? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. रंगभूमी तेव्हाच जिवंत राहते, जेव्हा तिच्या अंगाखांद्यावर नाटक फुलते. एक काळ असा होता की, नाट्याकलेचे शिक्षण घेण्यासाठी मुंबई आणि पुणे येथेच जावे लागे. आज परिस्थिती बदलली आहे. बेळगावमध्ये अनेक रंगकर्मी आहेत, तेव्हाही होते. बाप्पा शिरवईकरांसारखे दिग्दर्शक आजही आठवतात. प्रश्न आहे तो नाटकाची-रंगभूमीची चळवळ सुरू होण्याची. ती जबाबदारी कोणाची? याचे आत्मपरीक्षण व्हायला हवे.
‘संगीत शाकुंतल’चा पहिला प्रयोग बेळगावला झाला. सरस्वती वाचनालयाने शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त नुकताच स्थानिक कलाकारांना घेऊन त्याचा प्रयोग केला. ‘नाट्यांकुर’द्वारे बेळगावमध्ये नाट्या चळवळीला गती देणाऱ्या डॉ. संध्या देशपांडे यांनी त्याचे दिग्दर्शन केले. मेधा मराठे अभिनयाच्या कार्यशाळा घेतात, नाट्या प्रयोगांचे दिग्दर्शन करतात. लवकरच संगीत कलाकार संघ वाङ्मय चर्चा मंडळाच्या पुढाकाराने ‘संशय कल्लोळ’ नाटकाचा प्रयोग करत आहे. आर्ट्स सर्कलसुद्धा ‘दीर्घांक’, ‘नाटिका’, ‘अभिवाचन’ अशा उपक्रमांनी रंगभूमीला साहाय्यभूत ठरत आहे. स्थानिक पातळीवर कलाकारांची वानवा नाही. परंतु, कलाकारांनीसुद्धा अभिनय करणे आणि मिरवणे यातील फरक नीट समजून घ्यायला हवा. स्थानिक पातळीवर मर्यादा येतातच. परंतु, अभिनयासाठी त्या नसाव्यात, हे लक्षात घ्यायला हवे. संस्थासुद्धा अगणित आहेत. प्रश्न आहे हे सर्वजण एकत्र एका व्यासपीठावर कधी येणार हा.
ज्यांच्याकडे संघ आहे, त्यांच्याकडे पैसे नाहीत. ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे कलाकार नाहीत. या दोन्ही अभावांना परस्परांनीच एकत्र येऊन उत्तर देता येते. सर्व संघांनी मिळून एक दमदार नाट्याप्रयोग दिल्यास बेळगावकर त्याचे स्वागतच करतील. नुकत्याच स्थापन झालेल्या ‘वेणुग्राम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’च्या माध्यमातून डॉ. राजेंद्र भांडणकर, ऋषिराज देशपांडे आणि त्यांचे सहकारी बेळगावला नाट्याप्रयोग होण्यासाठी धडपड करत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात नाट्याप्रयोगांचे आयोजन केले. त्यांना केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभते आहे. तथापि, ही मंडळी बऱ्याचदा पदरमोड करतात, हे विसरून चालणार नाही. याशिवाय नाट्या परिषदेने नाट्यामहोत्सव भरवला. वरेरकर नाट्या संघाने एकांकिका घेतल्या. कॅपिटल वन नाट्यास्पर्धांचे आयोजन करते. शारदोत्सवाच्या निमित्ताने अल्प प्रमाणात का होईना, दिग्दर्शन करणाऱ्या महिला आहेत. ही आशादायी बाब आहे. तथापि, गुणवत्ता आहे, सादरीकरणाची इच्छा आहे, फक्त वेगळ्या चुली न मांडता एकाच व्यासपीठावर येऊन बेळगावच्या नाट्या चळवळीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
गरज पुन्हा एकदा सक्रिय होण्याची
सर्व कलाकार किंवा नाट्यासंस्थांनी एकाच व्यासपीठावर येण्यास काहीच हरकत नाही. हा दृष्टिकोन ठेवून रंगभूमी कशी वाढीस लागेल, हे पाहायला हवे. यासाठी मान्यताप्राप्त संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. मुख्य म्हणजे तुलना टाळायला हवी. रंगभूमी जगवण्यासाठी वातानुकूलित नाट्यागृह, सर्व सुविधा आवश्यक आहेत. पण तेवढ्यानेच रंगभूमी टिकत नाही. प्रसिद्ध अभिनेते, नाट्याप्रेमी नासिरुद्दीन शाह म्हणतात, दोन माणसे एकत्र या व नाटक करा. ते घरी करा, शाळेत करा, टेरेसवर करा किंवा रस्त्यावर करा, नाटक होणे महत्त्वाचे. जागतिक पातळीवर नाटक कोठे आहे? आपण कोठे आहोत? हेसुद्धा तपासायला हवे. रंगभूमी संपणार, असे नक्राश्रू काढण्याचे कारण नाही. गरज आहे ती फक्त हेवेदावे, गैरसमज, वेगळ्या चुली यांना बाजूला सारून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची.
-डॉ. संध्या देशपांडे
रसिकांनी प्रतिसाद देणे आवश्यक
बेळगावकर रसिक आणि नाटक यांचे अतूट नाते आहे. 1970 पासून मी बेळगावमध्ये वेगवेगळी नाटके आणली. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तेव्हा होता. संगीत नाटकांनासुद्धा प्रतिसाद मिळत असे. सीमा करामुळे आणि नंतर कोरोनामुळे नाटक येण्याचे प्रमाण कमी झाले. पण आता पुन्हा नाटक घेऊन येतो आहे. आजसुद्धा नाट्याप्रयोग आहे. रसिकांनी प्रतिसाद देणे आवश्यक आहे.
-अनंत जांगळे
बेळगावला नाटकासाठी प्रयत्नशील
बेळगावमध्ये मध्यंतरी नाटकाचे प्रयोग पूर्णपणे थंडावले होते. बेळगावमधून नाटक पूर्णत: लुप्त होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या प्रयत्नाला भरघोस प्रतिसाद नसला तरी थोडाफार मिळतो आहे. मुळात या संदर्भात आमच्या काही योजना आहेत. पण ही संस्था अगदी अलीकडची असल्याने प्रथम रसिकांच्या विश्वासास पात्र होणे आम्हाला महत्त्वाचे वाटते. जे जे शक्य असेल ते ते करून बेळगावला नाटक येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
-डॉ. राजेंद्र भांडणकर