For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आणखी एक अरुणा शानबाग नको...

06:35 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
आणखी एक अरुणा शानबाग नको
Advertisement

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानत वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, अधिकारी-कर्मचारी पूर्ण तन-मनाने काम करीत असतात. ऊग्णांची सेवा करण्यासारखे पवित्र काम डॉक्टर करीत असतानाच या डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्यावर कडक कायदे करण्याची तयारी सुरु असतानाच दुसरीकडे अनेक महिला

Advertisement

डॉक्टर लैंगिक अत्याचाराच्या बळी पडत आहेत. यामुळे भविष्यात आणखी एक अऊणा शानबाग नको असे म्हणण्याची वेळ आली आहे.

जिवंतपणी मरणयातना काय असतात ते 42 वर्षे एकाच पलंगावर पडुन जगलेल्या माऊलीने सोसल्या आहेत. तर अनेकांनी याची देही याची डोळा पाहिल्या आहेत. या मरणयातनेतून कायमस्वऊपी सुटका होण्यासाठी इच्छामरण द्यावे यासाठी  न्यायालयाचे दरवाजे ठोठावले गेले. मात्र या 42 वर्षात एक जवळीक, आपुलकी आणि अनोखा नातेबंध निर्माण झाला होता. यामुळे या इच्छामरणाला प्रखर विरोध झाला. पण काळ कोणासाठी थांबत नाही. अखेर 18 मे 2015 रोजी तीची कायमची सुटका झाली. त्यावेळेस त्या रुग्णालयाच्या भिंतीना देखील हुंदका अनावर झाला होता. होय तीच ती अरुणा शानबाग... एका सैतानाच्या हल्यात मरणासन्न अवस्थेत जाऊन पोहचलेली. या घटनेने देश सुन्न झाला होता. तर ज्या मुंबईत ही घटना घडली होती. त्या मुंबईवर आणि वैद्यकीय क्षेत्रांत शोककळा पसरली होती. भविष्यात पुन्हा आणखी एक अरुणा शानबाग नको.. असे देशातील प्रत्येकजण प्रार्थना करीत होता. मात्र जे नको तेच झाले आणि कोलकात्यातील एका महिला डॉक्टरवर अरुणा शानबागसारखी परीस्थिती ओढवली. मात्र या घटनेत डॉक्टर तरूणीला आपला जीव गमवावा लागल्याने पुन्हा एकदा अरुणा शानबागच्या आठवणीने अंगावर शहारे आले.

Advertisement

ज्या वैद्यकीय समुदायाकडे नेहमीच समाजाचा कणा म्हणून पाहिले जाते. तर डॉक्टर आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांना देवदूत म्हणून संबोधले जाते. देवानंतर आपल्या आयुष्याची दोरी ज्याच्या हाती असते तो डॉक्टर म्हणजेच देवदूत आहे. मात्र हा देवदूतच सध्या दहशतीखाली काम करीत आहे. कोठून कसा हल्ला होईल ते सांगता येत नसल्याचे

डॉक्टररुपी देवदूतांचे म्हणणे आहे. तर अहोरात्र रुग्णालयात काम करीत असताना महिला डॉक्टर लैंगिक अत्याचाराचे बळी ठरत आहेत. रुग्णसेवा करीत असताना बरोबर काम करणाऱ्या कामगारांसह येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या विकृत नजरांचा सामना या महिला डॉक्टरांना करावा लागत आहे.

मात्र याची कुठेही तक्रार न करता अगदी प्रामाणिकपणे रुग्णसेवा या महिला डॉक्टरांकडून केली जाते. जिथे कामासाठी दिवसाचे 24 तासही कमी पडतात आणि रुग्णांसाठी पूर्णवेळ सजग राहून स्वत:च्या प्रकृतीची पर्वा न करता, दिवसरात्र रुग्णसेवेचा वसा ज्यांनी घेतला आहे, त्यांना मात्र लाथा-बुक्क्यांचा प्रसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी सायन रुग्णालयात एका महिला

डॉक्टरवर रुग्णालयात आलेल्या बहीण भावांनी शिविगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार ताजा आहे.

कोलकाता येथील आरजी कर या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तरूणी साखरझोपेत असताना तिच्यावर नराधमाने अत्याचार केला. वासनांध विकृताने या तरूणीच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडत तिची हत्या केली. कोलकत्यातील या घटनेने पुन्हा एकदा आठवणींच्या स्मृतीआड गेलेली अरुणा शानबाग आठवली. अरूणाच्या मारेकऱ्याला केवळ सात वर्षाची शिक्षा झाली. मात्र या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देणेच योग्य ठरेल.

वास्तविक पाहिले तर शानबाग प्रकरणामुळे जरी तत्सम कायदेशीर सुधारणा करण्यात आल्या असल्या, तरी महिला लैंगिक हिंसाचार आणि छळाला अजूनही बळी पडताना दिसतात. म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत महिलांच्या संरक्षणासाठी न्यायप्रणालीला आणखी कडक आणि प्रभावी कायदा करण्याची नितांत गरज आहे. कधी पुऊषांकडून छेडछाड, दुय्यम वागणूक, वेशभूषेवर टोमणे, लगट करण्यापासून ते अगदी हिंसाचार, बलात्कार आणि हत्येपर्यंत या नराधमांची मजल जाते, हे स्वत: त्या स्त्राrलादेखील समजू शकत नाही.

वैद्यकीय व्यवसायासोबत येणारे दबाव, उपेक्षा आणि कामाच्या वेळा अशा अनेक स्तरांवर आधीच महिला जुळवून घेताना दिसतात, ज्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम तर होतोच, शिवाय

डॉक्टरांची या दैवी व्यवसायाची बांधिलकीदेखील जोपासताना दमछाक होते. लैंगिक हिंसाचार आणि छळाचा कायमच धोका महिला वैद्यकीय व्यावसायिकांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम करतो.

अनेकांना भीतीपोटी काम करण्यास भाग पाडले जाते, ज्याचा परिणाम केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरच होत नाही, तर त्यांच्या व्यावसायिक बांधिलकीवरही होतो. छेडछाडीला सामोरे जाण्याचा मानसिक आघात किंवा त्याची भीती या स्त्रियांमध्ये नैराश्य, चिंता आणि एकटेपणाची भावना निर्माण करते. ज्या मुली उच्च आदर्श आणि आकांक्षा घेऊन वैद्यकीय व्यवसायात प्रवेश करतात, त्यांना अशा धोक्यांची वास्तविकता उच्चतम प्रगतीपासून, विशिष्ट क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यापासून किंवा व्यवसायात पुढे जाण्यापासून परावफत्त करू शकते. याचा केवळ त्यांच्या करिअरवरच परिणाम होत नाही, तर समाज त्यांच्या अमूल्य योगदानापासूनही वंचित राहतो.

लॅन्सेटच्या अहवालानुसार 2007 ते 2019 या काळात भारतात आरोग्य कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या 153 घटना नोंदवल्या गेलेल्या आहेत. प्रत्यक्षात हा आकडा अजून बराच जास्त आहे. व्हायलन्स अगेन्स्ट हेल्थकेअर वर्कर्स (व्हीएसीएचडब्ल्यु) ही संघटना भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची नोंद घेते. त्यांच्या अहवालानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या 2020 मध्ये 225 तर 2021 मध्ये 110 घटना घडलेल्या आहेत. यामध्ये अगदी कनिष्ठ स्तरावरील आरोग्य सेविका ते

हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश आहे.

या अहवालात आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी केलेल्या 2020 च्या केंद्रीय कायद्याचा उल्लेख आहे. अशा प्रकारच्या घटना ऊग्णालयात घडू नयेत यासाठी देखील राज्यातील त्यातल्या त्यात मुंबईतील रुग्णालयात पोलिसांची गस्त सुऊच असते. मात्र त्यातुनही हे माथेफिरु  वैद्यकीय क्षेत्रातील देवदूतावर हल्ला करतातच. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी जलद आणि निश्चित न्याय मिळाला तर याला कमी प्रमाणात का होईना आळा बसेल. रुग्णालयात प्रत्येक ठिकाणी पोलिसांची गस्त सुरु झाली तरंच असे प्रकार नियंत्रणात येतील. साहजिकच भविष्यात आणखी एक अरुणा शानबाग होणार नाही.

- अमोल राऊत

Advertisement
Tags :

.