सैन्यासोबत संबंध बिघडवू नका!
खालिदा झियांच्या बीएनपीचा युनूस यांना इशारा
वृत्तसंस्था/ढाका
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा पक्ष बीएनपीने मोहम्मद युनुस यांच्या अंतरिम सरकारला सैन्यासोबत तणाव टाळण्याचा सल्ला दिला आहे. सैन्याधिकाऱ्यांच्या विरोधात नागरी लवादात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीकडून ही टिप्पणी करण्यात आली आहे. हे नवे खटले अंतरिम सरकार आणि सैन्यादरम्यान तणावाचे कारण ठरत असल्याचे चित्र आहे.
युनूस यांच्याकडून ढाका येथे बोलाविण्यात आलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत बीएनपीकडून ही भूमिका मांडण्यात आली. सशस्त्र दलांसोबत अंतरिम सरकारने चांगले संबंध राखावेत अशी आमच्या पक्षाची इच्छा आहे. आम्ही अस्थिरतेची कुठलीच जोखीम पत्करू शकत नाही, कारण देश याकरता तयार नसल्याचे वक्तव्य बीएनपीच्या स्थायी समितीचे सदस्य सलाहुद्दीन अहमद यांनी बैठकीत युनूस यांना उद्देशून म्हटले आहे.
देशात स्थिरता आवश्यक
बीएनपीने फेब्रुवारीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी स्थिरतेवर जोर दिला. आगामी निवडणुकीपूर्वी अस्थिरतेचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अशास्थितीत सैन्यासोबत सरकारचा तणाव योग्य नाही असा इशारा बीएनपीने दिला आहे. बांगलादेशच्या न्यायाधिकरणाने मागील आठवड्यात शेख हसीना यांच्यासमवेत 16 कार्यरत सैन्याधिकारी आणि 14 अन्य लोकांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.