भारतात बसून बांगलादेशवर बोलू नका
मुहम्मद युनूस यांचा शेख हसीना यांना सल्ला
वृत्तसंस्था/ढाका
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सल्ला दिला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतातून राजकीय टिप्पणी करणे योग्य नाही. जोपर्यंत बांगलादेश त्यांच्या प्रत्यार्पणासाठी भारतासोबत चर्चा करत नाही, तोपर्यंत त्यांनी स्वत:चे तोंड बंद ठेवावे. तरच दोन्ही देशांचे संबंध सुरळीत राहू शकतील. हसीना यांनी भारतातून राजकीय टिप्पणी करणे मैत्रीच्या विरोधातील संकेत असल्याचा दावा युनूस यांनी केला आहे.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद युनूस यांनी भारत आणि बांगलादेशमधील तणाव संपुष्टात आणणे आणि संबंध सुधारण्यासाठी मिळून काम करण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे. बांगलादेश भारतासोबतच्या मजबूत संबंधांना महत्त्व देतो, परंतु शेख हसीना यांच्याशिवाय बांगलादेशची स्थिती अफगाणिस्तानसारखी होईल या मानसिकतेतून भारताने बाहेर पडणे गरजेचे आहे. तसेच अवामी लीग वगळता उर्वरित अन्य राजकीय पक्षांना कट्टरवादी ठरविणे देखील भारताने बंद करावे असे मुहम्मद युनूस म्हणाले.
शेख हसीना यांच्या भूमिकेबद्दल भारतातही सर्वजण सहमत नाहीत. त्या भारतात असून त्यांच्या वक्तव्यांमुळे समस्या निर्माण होत आहे. भारतात बसून त्या बोलत आहेत आणि निर्देश देत आहेत. हा प्रकार पचनी पडणारा नाही. बांगलादेश सरकार जोवर प्रत्यार्पणाची मागणी करणार नाही तोवरच भारत शेख हसीना यांना आश्रय देणार आहे, परंतु याकरता त्यांनी गप्प बसणे अट असेल असे त्यांनी म्हटले आहे.
शेख हसीना यांचे वक्तव्य
13 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी न्यायाची मागणी करत बांगलादेशात झालेले दहशतवादी कृत्य, हत्या आणि क्रौर्यात सामील लोकांची चौकशी करण्याची मागणी केली होती. याच वक्तव्याचा संदर्भ युनूस यांनी दिला आहे. शेख हसीना या लोकांचे बंड आणि जनतेच्या संतापानंतर भारतात पोहोचल्या आहेत. अंतरिम सरकार बांगलादेशच्या लोकांसाठी न्याय सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. याकरता शेख हसीना यांना देशात परत आणणे आवश्यक आहे. येथे सर्वांसमोर खटला चालविला जाण्याची गरज असल्याचे युनूस यांनी म्हटले आहे.
भारत-बांगलादेश संबंध
भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे, परंतु केवळ हसीनांचे नेतृत्व देशाला स्थैर्य देऊ शकते हे म्हणणे भारताने सोडून द्यावे. बांगलादेश अन्य कुठल्याही देशाप्रमाणेच एक शेजारी आहे. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ले रोखण्यात येत आहेत. आता दोन्ही देशांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचा दावा त्यांनी केला आहे.