माझ्या सहनशिलतेचा अंत पाहू नको
देवेगौडांची प्रज्ज्वलला ताकीद : पोलिसांपुढे आत्मसमर्पण करण्याचा दिला सल्ला
बेंगळूर : अश्लील चित्रफीत आणि लैंगिक शोषण प्रकरणी आरोप असणारे प्रज्ज्वल रेवण्णा यांना माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी भारतात परतण्याचा सल्ला दिला होता. आता माजी पंतप्रधान आणि निजद सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी, माझ्या सहनशिलतेचा अंत पाहू नको; भारतात परतून एसआयटीसमोर हजर होण्याची ताकीद दिली आहे. गुरुवारी देवेगौडा यांनी पत्रक जारी केले असून ते ट्विटवर हॅन्डलवरही अपलोड केले आहे. लोक माझ्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल अत्यंत अपमानास्पद बोलत आहेत. हे सर्व माहित असूनही मी त्यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यांच्यावर टिकाही करणार नाही. आरोप करणाऱ्यांनी अश्लील चित्रफीत प्रकरणातील सर्व वस्तुस्थिती बाहेर येईपर्यंत संयम बाळगणे अपेक्षित होते. अलीकडच्या काळात घडलेले राजकीय षड्यंत्र, कारस्थान, घोटाळे याविषयी विश्लेषण करणार नाही. काही असो, प्रज्ज्वलने भारतात परत येऊन पोलिसांपुढे आत्मसमर्पण करावे आणि खटल्याला सामोरे जावे. हा आपला शेवटचा इशारा आहे. कथित गैरकृत्याविषयी न्यायनिवाडा करण्यास कायदा अस्तित्वात आहे. जर माझ्या इशाऱ्याचे पालन न केल्यास कुटुंबाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. माझ्याबद्दल तुझ्या मनात आदर असेल तर मायदेशात परतून पोलिसांपुढे शरणागती पत्करावी, असा उल्लेख पत्रकात केला आहे.